Navi Mumbai : नवी मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदाचा अंतिम निर्णय उद्या होण्याची दाट शक्यता असून, त्याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. महापौरपदासाठी सर्वसाधारण महिला आरक्षण जाहीर झाल्यानंतर भारतीय जनता पक्षात हालचालींना वेग आला असून, या पदासाठी कोणत्या महिला नगरसेविकेच्या नावावर शिक्कामोर्तब होणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी होणाऱ्या महत्त्वपूर्ण भेटीनंतर महापौरपदाचा अंतिम फैसला होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेची महापौर निवडणूक येत्या ३१ जानेवारी रोजी होणार आहे. या पार्श्वभूमीवर नवी मुंबईतील भाजपाचे ६६ नगरसेवक उद्या मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. या बैठकीदरम्यान महापौरपदासाठी निवड करण्यात आलेल्या महिला नगरसेविकांची अंतिम यादी मुख्यमंत्र्यांकडे सादर केली जाणार असल्याची माहिती आहे. या चर्चेतूनच महापौरपदाच्या उमेदवारीबाबत स्पष्टता येण्याची शक्यता आहे.
दरम्यान, स्थानिक पातळीवर भाजपाने संघटनात्मक हालचालींना गती दिली असून, माजी महापौर सागर नाईक यांची सर्वसंमतीने गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. पक्षांतर्गत समन्वय राखत महापौरपदासाठी योग्य उमेदवार निवडण्यावर भर दिला जात आहे. नवी मुंबईतील एकूण ३६ महिला नगरसेविकांपैकी प्रारंभी नऊ नगरसेविकांची नावे निश्चित करण्यात आली होती. त्यानंतर त्यामध्ये आणखी दोन नावे समाविष्ट करण्यात आल्याने, सध्या एकूण अकरा महिला नगरसेविका या पदाच्या शर्यतीत आहेत.
महापौरपदाच्या प्रमुख दावेदारांमध्ये रेखा म्हात्रे, सलूजा सुतार, अदिती नाईक, अंजनी भोईर, दयावती शेवाळे, नेत्रा शिर्के, वैष्णवी नाईक, शुभांगी पाटील, ॲड. भारती पाटील आणि माधुरी सुतार यांचा समावेश आहे. या सर्व महिला नगरसेविकांचा अनुभव, पक्षनिष्ठा आणि संघटनात्मक योगदान लक्षात घेऊन अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याची चर्चा आहे.
महापौरपदासाठी महिला आरक्षण जाहीर झाल्याने नवी मुंबईच्या राजकारणात नवा उत्साह निर्माण झाला असून, उद्या होणाऱ्या घडामोडींमुळे महापौरपदाचा चित्र स्पष्ट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नवी मुंबईच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या या पदासाठी कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.









