Home / महाराष्ट्र / NCP Sharad Pawar : विलीनीकरणाच्या चर्चेला पूर्णविराम! शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा ‘प्लॅन रेडी’;’तुतारी’ फुंकणार पक्षविस्ताराचा एल्गार?

NCP Sharad Pawar : विलीनीकरणाच्या चर्चेला पूर्णविराम! शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा ‘प्लॅन रेडी’;’तुतारी’ फुंकणार पक्षविस्ताराचा एल्गार?

NCP Sharad Pawar : गेल्या काही काळापासून राजकीय वर्तुळात रंगलेल्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या विलीनीकरणाच्या चर्चेला आता पूर्णविराम मिळाल्याचे स्पष्ट...

By: Team Navakal
NCP Sharad Pawar
Social + WhatsApp CTA

NCP Sharad Pawar : गेल्या काही काळापासून राजकीय वर्तुळात रंगलेल्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या विलीनीकरणाच्या चर्चेला आता पूर्णविराम मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आपले संपूर्ण लक्ष संघटनात्मक मजबुतीवर केंद्रित केले असून, मुंबईत गेल्या तीन दिवसांपासून पक्षाच्या महत्त्वाच्या बैठकांचे सत्र सुरू आहे. या बैठकांमध्ये विलीनीकरणाच्या मुद्द्यावर वेळ न घालवता, पक्ष कशा प्रकारे तळागाळापर्यंत पोहोचवता येईल आणि आगामी काळातील आव्हानांना कसे सामोरे जाता येईल, यावर भर देण्यात येत आहे.

संघटनात्मक मजबुती आणि आगामी कार्यक्रम-
राष्ट्रीय कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे आणि प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईतील ‘बॅलार्ड पीअर’ येथील पक्ष कार्यालयात विविध विभागांच्या (सेल्स) आढावा बैठका संपन्न होत आहेत. या बैठकीत पदाधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत की, पुढील वर्षभराच्या कार्यक्रमांचे योग्य नियोजन करून सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर रस्त्यावर उतरून संघर्ष करावा. येत्या मे महिन्यात जिल्हाध्यक्षांचे आणि त्यानंतर राज्यातील सर्व तालुकाध्यक्षांचे विशेष शिबिर आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती पक्षाकडून देण्यात आली आहे. निवडणुकीच्या धावपळीमुळे प्रलंबित असलेले संघटनात्मक निर्णय आता जलदगतीने घेतले जात असून, सक्षम कार्यकर्त्यांच्या नव्या नियुक्त्यांवर भर दिला जात आहे.

शशिकांत शिंदे यांची आक्रमक भूमिका-
माध्यमांशी संवाद साधताना प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी सांगितले की, “पक्ष संघटना अधिक प्रभावी करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. गेल्या आठवड्यात जिल्ह्यांच्या बैठका पूर्ण झाल्या असून, आता प्रत्येक सेलचा आढावा घेतला जात आहे. महाराष्ट्रातील ज्वलंत प्रश्नांवर आक्रमकपणे लढणारा पक्ष म्हणून आम्ही जनतेसमोर जाणार आहोत.” जिल्हा पातळीवर आवश्यक असलेल्या फेरबदलांचे संकेतही त्यांनी यावेळी दिले असून, लवकरच राज्याच्या कार्यकारणीबाबतही अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

बारामती पोटनिवडणुकीसाठी रोहित पवारांची शिष्टाई-
दुसरीकडे, बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी, या उद्देशाने आमदार रोहित पवार यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेतली. या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना रोहित पवार म्हणाले की, “महाराष्ट्राची राजकीय संस्कृती जपली जावी आणि ही निवडणूक बिनविरोध व्हावी, हीच आमची प्रामाणिक इच्छा आहे. मी कोणाच्या विरोधात नाही, तर अजितदादांवरील प्रेमापोटी आणि राजकीय सुसंस्कृतपणा टिकवण्यासाठी ही विनंती करायला आलो आहे.”

काँग्रेसच्या हायकमांडकडे निर्णयाचा चेंडू
रोहित पवार यांनी केवळ प्रदेशाध्यक्षांशीच नव्हे, तर महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्याशीही या विषयावर सविस्तर चर्चा केली. काँग्रेसने बारामतीमधून आपली उमेदवारी मागे घ्यावी, अशी आग्रही विनंती त्यांनी केली आहे. यावर रमेश चेन्नीथला यांनी सकारात्मक प्रतिसाद देत, पक्षश्रेष्ठींशी चर्चा करून लवकरच अंतिम निर्णय कळवू, असे आश्वासन दिले आहे.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या