Home / महाराष्ट्र / Neelam Gorhe : अशोक खरात प्रकरणाचा वणवा आता विधान परिषदेपर्यंत; तृप्ती देसाईंच्या आरोपाला नीलम गोऱ्हेंच प्रतिउत्तर

Neelam Gorhe : अशोक खरात प्रकरणाचा वणवा आता विधान परिषदेपर्यंत; तृप्ती देसाईंच्या आरोपाला नीलम गोऱ्हेंच प्रतिउत्तर

Neelam Gorhe : महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या भोंदू अशोक खरात प्रकरणाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत असून, आता या प्रकरणाचे धागेदोरे थेट राज्याच्या...

By: Team Navakal
Neelam Gorhe
Social + WhatsApp CTA

Neelam Gorhe : महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या भोंदू अशोक खरात प्रकरणाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत असून, आता या प्रकरणाचे धागेदोरे थेट राज्याच्या विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्यापर्यंत पोहोचले आहेत. सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी आज सकाळी घेतलेल्या धडाकेबाज पत्रकार परिषदेत नीलम गोऱ्हे यांच्यावर अत्यंत गंभीर स्वरूपाचे आरोप केल्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या आरोपांनंतर नीलम गोऱ्हे यांनीही तातडीने पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडली असून, यामुळे आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत.

मंत्रीपद आणि राजकीय भविष्यासाठी ‘खरात’ची मदत?
तृप्ती देसाई यांनी आपल्या पत्रकार परिषदेत खळबळजनक दावा केला आहे की, नीलम गोऱ्हे यांनी आपल्या राजकीय भविष्यातील वाटचालीसाठी आणि मंत्रिमंडळात स्थान मिळवण्यासाठी भोंदू अशोक खरात याची मदत घेतली होती. देसाई यांच्या मते, खरातच्या माध्यमातून करण्यात आलेल्या काही धार्मिक विधी किंवा सल्ल्यांचा आधार गोऱ्हे यांनी घेतला होता. एका उच्चपदस्थ घटनात्मक पदावर असलेल्या व्यक्तीचे नाव अशा प्रकारे एका भोंदू बाबाशी जोडले गेल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

नीलम गोऱ्हे यांचे सडेतोड प्रत्युत्तर-
तृप्ती देसाईंच्या आरोपांनंतर नीलम गोऱ्हे यांनीही आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. आपल्या प्रदीर्घ सामाजिक आणि राजकीय कारकिर्दीवर चिखलफेक करण्याचा हा प्रयत्न असल्याचे त्यांनी नमूद केले.

“भोंदूंचे संस्कार माझ्यावर नाहीत”; नीलम गोऱ्हे यांनी तृप्ती देसाईंचे सर्व आरोप फेटाळले, राजकीय द्वेषातून बदनामीचा दावा-
नीलम गोऱ्हे यांनी अत्यंत संयमित परंतु ठाम शब्दांत त्यांनी आपल्यावरील सर्व आरोप निराधार असल्याचे सांगत, भोंदू अशोक खरात याच्याशी आपला कोणताही संबंध नसल्याचे जाहीर केले. “भोंदू बाबांना भेटण्याचे संस्कार माझ्यावर मुळीच नाहीत,” अशा शब्दांत त्यांनी तृप्ती देसाईंना प्रत्युत्तर दिले आहे.

हॉटेलमधील भेटीच्या बातम्या केवळ कपोलकल्पित-
गेल्या काही दिवसांपासून ‘नीलम गोऱ्हे यांनी अशोक खरातची एका हॉटेलमध्ये गुप्त भेट घेतली’ अशा बातम्या समाजमाध्यमांवर आणि राजकीय वर्तुळात पसरवल्या जात होत्या. यावर भाष्य करताना गोऱ्हे म्हणाल्या की, “मी खरातला हॉटेलमध्ये भेटले किंवा त्याच्याशी कोणताही संवाद साधला, या वृत्ताचा मी पूर्णपणे इन्कार करते. या सर्व बातम्या पूर्णतः काल्पनिक असून त्यात यत्किंचितही तथ्य नाही. केवळ माझी प्रतिमा मलीन करण्यासाठी हा बनाव रचला गेला आहे.”

राजकीय ईर्ष्येतून बदनामीचे षडयंत्र-
आपल्यावरील या आरोपांमागे राजकीय द्वेष असल्याचे संकेतही त्यांनी दिले. “माझ्या मंत्रिपदामुळे आणि माझ्या राजकीय यशा मुळे काही व्यक्तींच्या मनात माझ्याबद्दल द्वेष निर्माण झाला आहे. आजवर माझ्या कामाची जी प्रशंसा झाली, ती काही लोकांना रुचलेली नाही. त्यातूनच हा सर्व खोडसाळपणा सुरू आहे,” असे प्रतिपादन त्यांनी केले. मंत्रीपद मिळवण्यासाठी मी कोणत्याही भोंदू बाबाची मदत घेतली नाही आणि भविष्यातही अशा गोष्टींवर माझा विश्वास नसेल, असे त्यांनी स्पष्टपणे नमूद केले.

“माझ्या संपूर्ण आयुष्यात कोणत्याही बाबाला भेटले नाही”; डॉ. नीलम गोऱ्हे यांचे प्रखर प्रतिपादन, भोंदूगिरीच्या आरोपांचे केले समूळ खंडन-
अशोक खरात या भोंदू बाबाशी नाव जोडले गेल्याने संताप व्यक्त करत, गोऱ्हे यांनी आपल्या वैयक्तिक जीवनातील शिस्त आणि संस्कारांचा दाखला दिला. “माझ्या संपूर्ण हयातीत मी किंवा माझ्या कुटुंबातील कोणीही अशा कोणत्याही भोंदू बाबाची भेट घेतलेली नाही,” असे विधान करत त्यांनी सर्व चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे.

राजकीय संघर्षाचे नवे केंद्र-
अशोक खरात प्रकरण आता केवळ लैंगिक शोषण किंवा आर्थिक फसवणुकीपुरते मर्यादित राहिलेले नाही. रूपाली चाकणकर यांच्यानंतर आता नीलम गोऱ्हे यांचे नाव या वादात ओढले गेल्याने, हे प्रकरण सत्ताधारी आणि विरोधकांमधील राजकीय संघर्षाचे नवे केंद्र बनले आहे.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या