Nilesh Rane : निवडणुकीच्या पार्शवभूमीवर अनेक पक्षांमधील अंतर्गत वाद पाहायला मिळाले. यात एक वाद जास्त रंगला तो म्हणजे शिवसेना आणि भाजप.यावर आता पडदा पाडण्याचे काम सध्या सुरु असल्याचे दिसून येत आहे.
माझ्या मनात भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याबद्दल खूप आदर आहे आणि तो पुढेही कायम राहणार आहे, असे सांगत शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी शिवसेना–भाजपा मतभेदावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
राणे म्हणाले की, माझ्यात आणि रवींद्र चव्हाण यांच्या मध्ये नेमका कसला वाद होता? मी स्वबळावर निवडणूक लढवली. माझी इच्छा होती की युती व्हावी, पण ती झाली नाही. मी पाठपुरावा करून काही गोष्टी जनतेसमोर ठेवल्या एवढाच प्रकार होता. आता मी रवींद्र चव्हाण आणि फडणवीस यांना भेटणार आहे. हे मी निवडणुकीच्या वेळीही स्पष्ट सांगितले होते. भाजपा हे देखील माझे कुटुंब आहे, त्यापासून मी फारकत घेऊ शकत नाही. हा आमच्या कुटुंबाचा विषय आहे आम्हीच सोडवून घेऊ.
नीलेश राणे पुढे म्हणाले की, मी तक्रारी मागे घेणार नाही. कारण मी ज्यांच्यासाठी तक्रार केली आहे त्यांच्यावर अन्याय होईल. भाजपामधून कुणीही मला तक्रार मागे घ्या असे सांगितलेले नाही. मी जे केले त्यातून माघार घेण्याचा प्रश्नच नाही. त्यामुळे आता आगामी काळात हि समीकरण कशी असणार हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे.









