Nilesh Rane : राज्यात मागच्या काही दिवसांपासून नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांची धामधूम होती. आणि कालच राज्यातील २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतीचा निकाल (Nagarparishad-Nagarpanchayat Election Result 2025) जाहीर झाला. या निवडणुकीत महायुतीने जोरदार बाजी मारली आहे.
नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या या निवडणुकीत कोकणातील निकालाकडे सर्वांचं लक्ष लागून होते. आणि मालवण नगरपरिषदेवर शिंदेंच्या शिवसेनेने दणदणीत विजय प्राप्त केला. शिवसेना शिंदे गट १० जागांवर विजयी, तर भाजपाला फक्त ५ जागांवर समाधान मानावे लागले. या निवडणुकीत सावंतवाडी नगरपरिषदेत भाजपाचा ११, शिवसेना शिंदे गटाला ७, काँग्रेसला १ आणि ठाकरेंच्या शिवसेनेचा १ उमेदवार विजयी झाले.
महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये विजय मिळवल्यानंतर शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी आपले स्पष्ट मत व्यक्त केले. या विजयाचे श्रेय देताना त्यांनी एकनाथ शिंदे यांचा खंबीर पाठिंबा आणि नारायण राणे यांचे आशीर्वाद आपल्या पाठीशे असल्याचे म्हटले आहे. तसेच, सर्व शिवसैनिकांनी घेतलेल्या मेहनतीमुळेच हे यश प्राप्त झाल्याचे देखील त्यांनी म्हटले.
निलेश राणे यांनी सांगितले की, विजयानंतर नारायण राणे यांच्याशी त्यांची भेट होऊ शकली नाही, कारण कणकवली आणि मालवणमधील परिस्थितीमुळे कुटुंबात देखील काही भावनिक गुंतागुंत सध्या निर्माण झाली होती.
ते सांगतात वडील म्हणून नारायण राणे यांच्यासाठी दोन्ही बाजू तितक्याच महत्वाच्या आहेत. ते कोणा एका बाजूला आनंदाने आशीर्वाद देऊ शकले नसते. याच कारणामुळे मी सेलिब्रेशन केले नाही असे देखील ते म्हणाले. नारायण राणे यांना राजकीय परिस्थितीची दूरदृष्टी असल्याचे देखील त्यांनी नमूद केले.
शिवसेना आणि भाजपने महायुती म्हणून एकत्र लढावे, अशी त्यांची कायमच इच्छा होती. असे झाले असते तर, कुटुंबातील अशा अडचणी आणि संभाव्य पराभव कदाचित टाळता आले असते. अशी थेट भूमिका यावेळी निलेश राणे यांनी मांडली.
हे देखील वाचा – Fruits Good For Kidneys : मूत्रपिंड निरोगी ठेवण्यासाठी ही ५ फळे ठरू शकतात उपयुक्त









