Nitesh Rane on Uddhav Thackeray : राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून 15 जानेवारीला मतदान आणि 16 जानेवारीला निकाल जाहीर होणार आहेत. या रणधुमाळीत भाजप नेते नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्यावरून जोरदार निशाणा साधला आहे.
एका टीव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत बोलताना राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्या राजकीय भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांना ‘स्वार्थी’ संबोधले आहे.
“उद्धव ठाकरेंचा स्वार्थच त्यांना राज ठाकरेंकडे घेऊन गेला”
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील वाढत्या जवळीकीवर भाष्य करताना नितेश राणे म्हणाले की, उद्धव ठाकरे स्वार्थाशिवाय कधीही कुणाच्या जवळ जात नाहीत. अचानक त्यांना राज ठाकरेंची काळजी का वाटू लागली, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
2014 ते 2019 या काळात देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना ज्या पद्धतीने साथ दिली आणि सांभाळले, तेवढे प्रेम त्यांच्या रक्ताच्या नात्यातील भावानेही दिले नसेल, असा दावा राणे यांनी केला. फडणवीसांना धोका देऊन काँग्रेससोबत जाणे आणि आता निवडणुकीसाठी राज ठाकरेंच्या जवळ जाणे, हा केवळ सत्तेचा खेळ असल्याचे त्यांनी म्हटले.
मुंबईतील मराठी माणसाच्या स्थितीवर ओढले ताशेरे
उद्धव ठाकरेंच्या कार्यकाळात मुंबईतील मराठी माणूस शहराबाहेर का फेकला गेला, असा सवाल नितेश राणे यांनी विचारला. ते म्हणाले की, “उद्धव ठाकरेंचे ‘मातोश्री 1’ आणि ‘मातोश्री 2’ उभे राहिले, पण मुंबईतला मराठी माणूस मात्र वसई, विरार, नालासोपारा आणि कल्याणच्या पलीकडे राहायला गेला. जर त्यांना मराठी माणसावर खरोखर प्रेम असते, तर मुंबईत मराठी माणसाचा टक्का का कमी झाला?” मुंबईला या ‘कचाट्यातून’ बाहेर काढण्याची वेळ आता आली असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.
देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाचे कौतुक
यावेळी नितेश राणे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यशैलीचे भरभरून कौतुक केले. फडणवीस हे समोरच्या माणसाचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतात आणि त्यांना वेळ देतात, हा त्यांचा मोठा गुण आहे. त्यांची उंची गाठण्यासाठी त्यांचे गुण आत्मसात करणे आवश्यक असल्याचे राणे म्हणाले. उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत राहिलेल्या निष्ठावानांचा विश्वास गमावला असून, आताची पिढी त्यांचा स्वार्थी स्वभाव ओळखून असल्याचेही त्यांनी नमूद केले.
16 जानेवारीला येणाऱ्या निकालांमधून मराठी माणूस या सर्व राजकारणाचे योग्य उत्तर देईल, असा विश्वास नितेश राणे यांनी व्यक्त केला आहे.











