Nitin Gadkari: निष्ठावंत प्रामाणिकपणे काम करणा-या जुन्या कार्यकर्त्यांना जपा, अशा शब्दात पक्षाच्या नेत्यांचे कान टोचतानाच ‘घर की मुर्गी दाल बराबर, बाहेरून आलेले सावजी चिकन’ अशा शब्दात भाजपाचे (BJP) ज्येष्ठ नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडक (Nitin Gadkari) पक्षाला घरचा आहेर दिला. निष्ठावंत कार्यकर्त्यांना न जपल्यास पक्ष ज्या वेगाने वर गेला त्याच वेगाने खाली आपटेल, असा इशाराही त्यांनी दिला.
भाजपात बाहेरून नेते व कार्यकर्ते यांचे सतत इनकमिंग सुरू असल्याने पक्षातील मूळ निष्ठावंत कार्यकर्ते व नेते अस्वस्थ आहेत. गडकरी यांनी नागपूर येथे एका कार्यक्रमात बोलताना या अस्वस्थ कार्यकर्त्यांची खदखद बोलून दाखवली.
गडकरी म्हणाले की, सावजी असल्याने बाहेरचा चिकन मसाला चांगला लागतो. पण जुन्या लोकांकडे लक्ष ठेवा. हे जोपासलेले कार्यकर्ते आहेत. त्यांची कदर करा. त्यांना जपा. नाहीतर जेवढ्या जोराने वरच्या दिशेने जात आहात, तितक्याच झपाट्याने खाली आपटाल.
नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर येथील रस्त्याच्या भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मंचावर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, कळमेश्वरचे भाजपचे आमदार आशिष देशमुख, राज्यमंत्री आशिष जयस्वाल, माजी आमदार सुधाकर कोहळे उपस्थित होते.
सोलापूर जिल्ह्यातील अलिकडेच काही माजी आमदारांच्या भाजपा प्रवेशाविरोधात भाजपा कार्यकर्त्यांनी तीव्र निदर्शने केली. अनेक दशके ज्यांच्याविरोधात संघर्ष केला, ते पक्षात आल्यावर त्यांच्याच प्रचाराची पालखी वाहावी लागत असल्याने कार्यकर्ते तीव्र नाराज आहेत. पुढील काही महिन्याxत राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका होणार असून राज्यभर विविध ठिकाणी तिकिटे मिळविण्यासाठी अन्य पक्षातील नेते भाजपात येण्यास इच्छूक आहेत. अनेक महापालिका व नगरपालिकांमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी व अनेक ठिकाणी निवडणूक जिंकण्यासाठी भाजपानेही अन्य पक्षातील नेत्यांना भाजपात आणण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत. या पार्श्वभूमीवर गडकरींचा घरचा आहेर म्हणजे पक्षाला इशारा मानला जात आहे.
हे देखील वाचा –
एलआयसीवर केंद्राचा दबाव; अदानीत अब्जावधीची गुंतवणूक









