Nitish Kumar : बिहारच्या राजकारणाने आज एक अनपेक्षित वळण घेतले असून, मुख्यमंत्री नितीश कुमार यांची राज्यसभेवर रवानगी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आज, ५ मार्च रोजी नितीश कुमार आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्याची दाट शक्यता असून, या प्रक्रियेसाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पाटण्यात दाखल होत आहेत. या निर्णयामुळे बिहारच्या सत्ताकारणात मोठे फेरबदल होण्याचे संकेत मिळत असतानाच, जनता दल युनायटेड (जेडीयू) च्या कार्यकर्त्यांमध्ये मात्र तीव्र असंतोष आणि संतापाची लाट उसळली आहे. “हा निर्णय नितीश कुमार यांचा नसून पक्षातील काही नेत्यांनी केलेली ही मोठी गद्दारी आहे,” अशी संतप्त प्रतिक्रिया कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे.
मुख्यमंत्री निवासाबाहेर आज सकाळी अत्यंत नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले जेडीयू कार्यकर्ते निवासाबाहेर मोठ्या संख्येने जमा झाले असून त्यांनी ‘नितीश कुमार बिहार सोडून कुठेही जाणार नाहीत’ अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला आहे. कार्यकर्त्यांचा असा आरोप आहे की, पक्षातील लल्लन सिंह, संजय झा आणि विजय चौधरी यांसारख्या ज्येष्ठ नेत्यांनी भाजपसोबत मिळून हा कट रचला आहे. काही कार्यकर्त्यांनी तर थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर ‘हजारो कोटींच्या करारा’चा आरोप करत हा बिहारच्या जनादेशाचा अपमान असल्याचे म्हटले आहे. या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर बिहारचे पोलीस महासंचालक (DGP) आणि अन्य वरिष्ठ पोलीस अधिकारी मुख्यमंत्री निवासावर तैनात करण्यात आले आहेत.
दुसरीकडे, नितीश कुमार यांनी सक्रिय राजकारणातून माघार घेतल्यास बिहारच्या मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीसाठी त्यांचे पुत्र निशांत कुमार यांच्या नावावर पडद्यामागे चर्चा सुरू असल्याचे समजते. पक्षाने अद्याप या शक्यतेचे अधिकृतपणे खंडन केलेले नाही. दरम्यान, उमेश कुशवाह यांची पुन्हा एकदा जेडीयूच्या प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लावण्याच्या निर्णयावर नितीश कुमार यांनी शिक्कामोर्तब केले आहे. पक्षात उभी फूट पडल्यासारखी स्थिती निर्माण झाली असून, दारू माफियांच्या दबावाखाली नितीश कुमार यांना बाजूला सारण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोपही काही कट्टर समर्थकांनी केला आहे. या सर्व गोंधळात नितीश कुमार नेमकी काय भूमिका घेतात आणि बिहारच्या सत्तेची सूत्रे कोणाकडे सोपवली जातात, याकडे आता संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले आहे.











