Navnath Waghmare : ओबीसी (OBC) नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांचे सहकारी नवनाथ वाघमारे (Navnath Waghmare) यांची कार अज्ञात व्यक्तीने पेटवून दिल्याची घटना काल मध्यरात्री जालना शहरातील नीलमनगर भागात घडली. सीसीटीव्ही (CCTV) फुटेजमध्ये एक व्यक्ती कारवर ज्वलनशील पदार्थ टाकताना दिसत आहे.
वाघमारेंनी या प्रकाराला मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थकांना जबाबदार धरले आहे. माझी गाडी जाळणे हा जरांगे समर्थकांचा कट आहे. यापुढे जरांगे यांच्या गाड्या जाळल्या तर आश्चर्य वाटून घेऊ नका, असा इशाराही त्यांनी दिला. तसेच गाडी जाळल्याप्रकरणी मनोज जरांगे, शरद पवार, रोहित पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
मराठा समाजाला ओबीसीत आरक्षण देण्याच्या मुद्यावरून राज्यात तणावाचे वातावरण असताना ही घटना घडली आहे. राज्य सरकारने हैदराबाद गॅझेटियर लागू करून मराठा समाजाला कुणबी जातप्रमाणपत्राद्वारे ओबीसी आरक्षणाचा मार्ग खुला केला आहे. त्यामुळे मराठा आणि ओबीसी समाजात आमनेसामने आले असतानाच वाघमारे यांच्या स्कॉर्पिओ गाडीवर हल्ला झाला. काल रात्री ११ वाजताच्या सुमारास गाडी उभी असताना अज्ञात व्यक्तीने ज्वलनशील पदार्थ टाकून ती पेटवून दिली.
या हल्ल्यावेळी गाडीत कुणीही नसल्यामुळे जीवितहानी झाली नाही, मात्र गाडीचे मोठे नुकसान झाले. स्थानिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत गाडी जळून खाक झाली होती. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला आहे.
हे देखील वाचा –
क्लबमध्ये मुलींसाठी सुविधा हव्यात!सचिन तेंडुलकर यांचे आवाहन
आशियातील पहिली महिला पायलट सुरेखा यादव निवृत्त; 36 वर्षांचा प्रेरणादायी प्रवास संपला
रक्त एकच ना? वडलांप्रमाणे जय शाहांनीही निर्णय घ्यावा!संजय राऊत यांचे विधान