पुणे – पुण्यातील रेव्ह पार्टी (Pune Rave Party) प्रकरणात अटक करण्यात आलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर आणि इतर चार आरोपींची कोठडी संपल्यानंतर त्यांना आज शिवाजीनगर न्यायालयात (Shivajinagar court)हजर करण्यात आले. यावेळी पोलिसांनी न्यायालयात दावा केला की, प्रांजल खेवलकर यांच्या फोनमध्ये (Phone) आक्षेपार्ह चॅट (Chat) आणि व्हिडीओ (video) सापडले आहेत. यामुळे त्यांच्या अडचणी वाढणार आहेत. खेवलकर यांनी एका महिलेचा नाचतानाचा व्हिडीओ दुसऱ्या आरोपीला पाठवला होता आणि त्या चॅटमध्ये ऐसा माल चाहिए असा मजकूर होता. त्यानंतर पोलिसांनी दोन दिवसांच्या पोलीस (Police) कोठडीची मागणी केली, मात्र न्यायालयाने सर्व आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.
माहिती तपास अधिकाऱ्यांनी न्यायलयात सांगितले की, प्रांजल खेवलकर यांनी एका महिलेचा नाचतानाचा व्हिडिओ दुसऱ्या आरोपीला पाठवला होता. त्या व्हिडिओत ‘ऐसा माल चाहीए’ असे शब्द वापरण्यात आले असून, संबंधित महिला आरोपी आणि प्रांजल गेल्या दोन वर्षांपासून संपर्कात आहेत. हा अंमली पदार्थ त्यांनी आणला. परंतु कुठून आणला हे सांगत नाहीत. गेल्या दोन वर्षांपासून प्रांजल त्या हॉटेलमध्ये नियमित जाऊन पार्टी करतात. या प्रकरणातील आणखी एक आरोपी राहुल नावाचा आहे, तो सध्या फरार आहे. प्रांजल यांच्या मोबाईलमध्ये अनेक आक्षेपार्ह गोष्टी, व्हिडिओ व माहिती सापडली असून त्याचा तपास करण्यासाठी आणखी पोलीस कोठडी आवश्यक आहे.
खेवलकर यांचे वकिल विजय ठोंबरे यांनी न्यायालयात जोरदार प्रतिवाद केला. त्यांनी म्हटले की, प्रांजल खेवलकर यांच्या कोठडीची काहीही गरज नाही. पोलीस न्यायालयाची फसवणूक करत आहेत. आज जे न्यायालायात सांगितले जात आहे ते खोटे आहे. माल चाहिए हा मेसेज आज कुठून आला? असा मेसेज पहिल्याच दिवशी का दाखवला नाही? या प्रकरणात इशा सिंगला पेरले आहे. प्रांजल आणि त्या लोकांमध्ये काहीही संबंध नाहीत. हा एक ट्रॅप आहे. त्यांच्या वैयक्तिक व्हिडिओचा या प्रकरणाशी आणि अंमली पदार्थ कायद्याशी काहीही संबंध नाही. हे व्हिडिओ केवळ खेवलकरांची बदनामी करण्यासाठी वापरले जात आहेत. जे अंमली पदार्थ सापडले त्याचे वजन करण्यात आलेले नाही, ते कुठून आले माहीत नाही . फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी कोर्टासमोर दिली जात आहे . हे पोलीस कसे काय करू शकतात? खोटे पुरावे न्यायालयात सादर करून कोठडी मागितली जात आहे.