Malad Station Crime-मुंबईत पश्चिम रेल्वेच्या मालाड रेल्वे स्थानकावर (Malad Station Crime) रक्तरंजित घटना घडली. लोकलमधून कुणी आधी उतरायचे यावर दोन प्रवाशांमध्ये झालेल्या वादातून पश्चिम रेल्वेच्या मालाड स्टेशनवर काल आलोक सिंह (Professor Alok Singh) या प्राध्यापकाची हत्या झाली. या घटनेने लोकल प्रवाशांत खळबळ माजली. पोलिसांनी सीसीटीव्ही पडताळणी करून १२ तासांत आरोपी शिंदे (Onkar Shinde) याला अटक केली. न्यायालयाने आज आरोपीला ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. मात्र मी हत्या केली नाही असा युक्तिवाद आरोपीच्या वकिलाने कोर्टात केला. (Mumbai crime news)
उपनगरीय रेल्वेतील तुफानी गर्दी व त्यामुळे परस्परांना लागणारे धक्के व वाद हे सर्व कधी थांबणार असा सवाल आता उपस्थित होत आहे. मुंबईच्या मालाड रेल्वे स्थानकावर लोकल आली असताना डब्यातच काल संध्याकाळी आलोक सिंह ( ३१ ) या प्राध्यापकाची पोटात धारदार शस्त्र खुपसून हत्या करण्यात आली. आलोक सिंग यांना पुढे सरकण्यासाठी आरोपी ओंकार शिंदे मागून ढकलत होता , पण पुढे महिला उभी असल्याने आलोक सिंग यांनी धक्का मारू नको, असे म्हटले. या किरकोळ वादाचे रूपांतर भांडणात झाले आणि उतरताना मी आधी उतरणार की तू हा वाद वाढला . यावेळी खिशात असलेल्या चिमट्याने आरोपीने आलोक सिंग यांच्या पोटात वार केला असा आरोप होत आहे. यात आलोक सिंहचा मृत्यू झाला. सीसीटीव्हीतील दृश्यानुसार ओंकार शिंदे हा मालाडला उतरून धावत पसार झाला . मात्र, चिमटा टोकदार असल्याने आलोक यांना गंभीर इजा झाली . त्यांना तातडीने जवळच असलेल्या शताब्दी रुग्णालयात नेण्यात आले. पण रक्तस्त्रावाने त्यांचा मृत्यू झाला. आरोपी ओमकार शिंदेला १२ तासात पोलिसांनी अटक केली व नंतर त्याला बोरिवली येथील रेल्वे पोलीस मुख्यालयात आणून त्याची कसून चौकशी करण्यात आली. ओंमकार शिंदे हा दक्षिण मुंबईत खेतवाडीत कामाला होता . तो चर्नीरोड स्टेशनवर लोकल मध्ये चढला होता .
आलोक सिंह हे विलेपार्ले येथील एनएम कॉलेजमध्ये गणिताचे प्राध्यापक असून मालाड पूर्वेला राहतात. ते कधीच कुणाच्या भांडणात पडत नसत,असे त्यांच्या सहकाऱ्यांनी सांगितले. शनिवारी कॉलेजमधून निघाल्यानंतर त्यांनी अंधेरीच्या प्लॅटफॉर्म ३ वरून ५ वाजून २५ मिनिटांनी बोरीवलीकडे जाणारी स्लो लोकल पकडली. ही लोकल ५ वाजून ४० मिनिटांनी मालाडच्या प्लॅटफॉर्म १ वर आली आणि ही घटना घडली. आता गुन्ह्यात वापरण्यात आलेले हत्यार आणि आरोपीची पार्श्वभूमी याची चौकशी पोलीस करणार आहेत.
दरम्यान आज आरोपीच्या वकीलानी कोर्टात युक्तिवाद करताना म्हटले की मुंबईच्या लोकल ट्रेनमधून रोज हजारो वेठबिगार जात असतात, त्यामुळे कामाचे सगळे साहित्य सोबत बाळगत असतात. आलोक सिंह यांना कोणाचीही काही वस्तू लागून इजा झाली असेल तर माहिती नाही. माझ्या अशिलाने ही हत्या केलेली नाही.









