Palghar News: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील (NH 48) वाहतूक नियोजनाबाबत पालघर जिल्हा प्रशासनाने काढलेल्या एका पत्रकामुळे सध्या जिल्ह्यात वादाचे वादळ उठले आहे. जड वाहनांच्या बंदीबाबतची अधिकृत अधिसूचना चक्क गुजराती भाषेत प्रसिद्ध करण्यात आल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ‘गुजराती प्रेमा’वर सोशल मीडियातून टीकेची झोड उठली आहे.
वाहतुकीत नेमका काय बदल आहे?
प्रशासनाने काढलेल्या अधिसूचनेनुसार, गुजरात सीमेलगत असलेल्या भिलाड येथे रेल्वे अंडरपासच्या सिमेंट बोगद्याचे काम सुरू आहे. त्यामुळे मुंबईकडे जाणाऱ्या अवजड वाहनांसाठी हा मार्ग खालील वेळेत बंद ठेवण्यात आला आहे:
- 19 जानेवारी: सकाळी 8 ते रात्री 10 वाजेपर्यंत.
- 20 जानेवारी: सकाळी 6 ते दुपारी 2 वाजेपर्यंत.
वादाचे नेमके कारण काय?
हे पत्रक मराठी आणि हिंदीसोबतच गुजराती भाषेतही काढण्यात आले आहे. काही पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी हे गुजराती पत्रक व्हॉट्सॲप स्टेटसवर ठेवल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. महाराष्ट्रातील एका जिल्हाधिकारी कार्यालयाने अशा प्रकारे परराज्यातील भाषेला अधिकृत पत्रकात स्थान दिल्याने मराठी प्रेमींकडून संताप व्यक्त केला जात आहे.
गुजरातमध्ये मराठीला स्थान नाही, मग पालघरमध्ये गुजराती का?
या वादाला आणखी एक पैलू आहे. गुजरात हद्दीतील भिलाड येथे काम सुरू असताना तिथल्या प्रशासनाने मराठी भाषिकांसाठी साधी सूचनाही मराठीत दिलेली नाही. पालघरमधील अनेक मराठी वाहनचालक या मार्गाचा वापर करतात, तरीही तिथल्या प्रशासनाला मराठीचा पुळका नाही. अशा परिस्थितीत पालघर प्रशासनाने मात्र पुढाकार घेऊन गुजराती भाषेत पत्रक काढल्याने प्रशासकीय धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
याआधीही डहाणू-पनवेल मेमू ट्रेनमध्ये गुजराती भाषेतील सूचनांवरून वाद झाला होता. आता पुन्हा एकदा सीमावर्ती भागात भाषेच्या मुद्द्यावरून तणाव निर्माण झाला आहे. महाराष्ट्राच्या हद्दीत अधिकृत कामकाजात मराठीला प्राधान्य असायला हवे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.








