Pankaja Munde : मंत्री पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये आज सकाळी तांत्रिक बिघाड आढळून आला. छत्रपती संभाजीनगर विमानतळावरून लातूरकडे उड्डाण घेण्यापूर्वीच वैमानिकाच्या लक्षात हा बिघाड आला. त्यामुळे संभाव्य अनर्थ टळला असून, सुरक्षेच्या कारणास्तव उड्डाण तात्काळ रद्द करण्यात आले.
जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी मुंडे लातूर दौऱ्यावर जाणार होत्या. टेकऑफपूर्वीच हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक समस्या असल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांच्या प्रवासाच्या वेळापत्रकात बदल करावा लागला. काही सभांच्या वेळाही पुढे ढकलण्यात आल्या. त्यानंतर पर्यायी हेलिकॉप्टरची व्यवस्था करून पंकजा मुंडे लातूरकडे रवाना झाल्या.
काल छत्रपती संभाजीनगरमधील वाळूज परिसरात झालेल्या सभेत ‘मी हेलिकॉप्टरने फिरते म्हणून माझी आई देव पाण्यात ठेवते,’ असे मुंडे यांनी सांगितले होते. त्यानंतर आज सकाळीच हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्याची घटना समोर आल्याने या योगायोगाची चर्चा रंगली आहे.
हेलिकॉप्टरची सखोल तांत्रिक तपासणी सुरू करण्यात आली असून, बिघाडाचे नेमके कारण काय याचा अहवाल मागवण्यात येणार आहे. दरम्यान, मुंडे सध्या मराठवाड्यात जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचार दौऱ्यावर आहेत.
सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर ही घटना गंभीर मानली जात आहे. अलीकडेच राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्याने हवाई प्रवासाच्या सुरक्षिततेबाबत चर्चा सुरू असतानाच ही घटना घडल्याने प्रशासन अधिक सतर्क झाले आहे.









