AB Form Controversy : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रभाग 16 मधून एक अत्यंत नाट्यमय घटना समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) अधिकृत उमेदवार जयश्री भोंडवे यांचा ‘एबी फॉर्म’ चक्क निवडणूक कार्यालयातून गहाळ झाला होता.
प्रशासनाच्या या चुकीमुळे सुरुवातीला त्यांना अपक्ष उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले होते. मात्र, न्यायालयीन लढा आणि तांत्रिक पुराव्यांच्या जोरावर त्यांनी अखेर पक्षाचे अधिकृत ‘घड्याळ’ चिन्ह मिळवण्यात यश मिळवले आहे.
नेमका पेच काय होता?
जयश्री भोंडवे यांनी मामुर्डी-किवळे-रावेत प्रभागातून नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) या जागेसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. अर्ज भरताना त्यांनी पक्षाचा अधिकृत एबी फॉर्म देखील जोडला होता. मात्र, छाननी प्रक्रियेदरम्यान हा फॉर्म गहाळ झाल्याचे कारण देत निवडणूक निर्णय अधिकारी हणमंत पाटील यांनी त्यांना अपक्ष ठरवले. या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आणि प्रशासनाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.
उच्च न्यायालय आणि सीसीटीव्ही पुराव्यांचा आधार
आपल्यावरील अन्यायाविरोधात भोंडवे यांनी तात्काळ उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यांनी अर्ज सादर करतानाची व्हिडिओग्राफी आणि सीसीटीव्ही फुटेज पुरावा म्हणून सादर केले. या पुराव्यांमध्ये त्या निवडणूक अधिकाऱ्याकडे फॉर्म जमा करताना स्पष्ट दिसत होत्या. न्यायालयाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत निवडणूक आयोगाला तातडीने स्वतंत्र सुनावणी घेण्याचे आदेश दिले.
न्यायालयाच्या आदेशानुसार, पालिका आयुक्त तथा मुख्य निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर यांनी तातडीची सुनावणी घेतली. यामध्ये भोंडवे यांनी विहित मुदतीतच एबी फॉर्म जमा केल्याचे तांत्रिक नोंदीवरून स्पष्ट झाले. त्यांचा फॉर्म अद्यापही प्रत्यक्ष सापडलेला नसला तरी, त्यांच्याकडे असलेली पोच आणि व्हिडिओ पुरावे ग्राह्य धरून आयुक्तांनी त्यांना राष्ट्रवादीची उमेदवारी बहाल केली.
दोषी अधिकाऱ्यावर प्रशासकीय कारवाई
या गंभीर निष्काळजीपणाचा फटका ‘ब’ प्रभागाचे निवडणूक निर्णय अधिकारी हणमंत पाटील यांना बसला आहे. आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी पाटील यांच्याकडील कामकाज तातडीने काढून घेतले असून त्यांच्या जागी उपजिल्हाधिकारी अर्चना तांबे यांची नियुक्ती केली आहे. प्रचंड अर्जांमुळे ही चूक झाली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात असला तरी, या संपूर्ण प्रकाराची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
या नाट्यमय घडामोडींनंतर जयश्री भोंडवे यांना अखेर अधिकृतरीत्या ‘घड्याळ’ चिन्ह मिळाले असून, यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.









