Piyush Goyal : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनपेक्षित वळणांचे नाट्य रंगत असून, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) नेतृत्वावरून वादाचे रणकंद माजले आहे. केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांनी वृत्त संस्थेला दिलेल्या एका मुलाखतीत, राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी प्रफुल्ल पटेल यांची नियुक्ती झाल्याचे थेट विधान केल्याने राजकीय वर्तुळात एकच भूकंप झाला आहे. पटेलांच्या नावाला पक्षात एकेकाळी मोठा विरोध असतानाही, आता पक्षाची सूत्रे त्यांच्याकडे गेल्याच्या वृत्ताने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
पियूष गोयलांचे भाष्य आणि सुनेत्रा पवारांचे स्वागत –
केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांनी महायुतीची भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, “अजितदादांच्या निधनानंतर राष्ट्रवादीच्या आमदारांनी सुनेत्रा पवार यांची पक्षनेते म्हणून एकमताने निवड केली आहे, ज्याचे आम्ही स्वागत करतो.” सुनेत्रा पवार यांच्या संवेदनशील नेतृत्वाचा उल्लेख करत त्यांनी राज्यसभेतील आणि बारामतीमधील त्यांच्या कार्याचा गौरव केला. अजितदादांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न निघणारी असल्याचे सांगत त्यांनी पवार कुटुंबाप्रती शोकसंवेदना व्यक्त केल्या. मात्र, पियूष गोयलांच्या या मुलाखतीनंतर प्रफुल्ल पटेल यांनी तत्काळ ट्विट करत अध्यक्षपदाचा दावा फेटाळून लावला असून हे सर्व वृत्त निराधार असल्याचे म्हटले आहे.
दुसरीकडे, या सर्व घडामोडींवर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी अत्यंत तिखट प्रतिक्रिया दिली आहे. सुनेत्रा पवार यांचा शपथविधी आणि त्यानंतरच्या राजकीय हालचालींबाबत विचारले असता, “मला यातील काहीच ठाऊक नाही, तर मी काय बोलणार?” असा प्रतिप्रश्न त्यांनी केला. निर्णय घेण्यासाठी इतकी घाई का केली जात आहे, अशी विचारणा करत त्यांनी या सर्व घडामोडींमागे सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल असावेत, असा संशय व्यक्त केला. सुनेत्रा पवार यांनी या निर्णयाबाबत आपल्याशी कोणतीही चर्चा केली नसल्याचेच शरद पवारांच्या वक्तव्यातून ध्वनित झाले आहे.
ऐक्याची चर्चा आणि ‘१२ फेब्रुवारी’चे ते गुपित-
या सर्व गोंधळात एका नव्या सत्याचा उलगडा झाला आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येण्याबाबत गेल्या चार महिन्यांपासून पडद्यामागे हालचाली सुरू होत्या. ही जबाबदारी स्वतः अजितदादा आणि जयंत पाटील यांच्यावर होती. “हा ऐतिहासिक निर्णय येत्या १२ फेब्रुवारी रोजी जाहीर होणार होता आणि ही तारीख खुद्द अजितदादांनीच निश्चित केली होती,” असा खुलासा शरद पवारांनी केला. दोन्ही बाजूंनी सकारात्मक चर्चा सुरू असतानाच काळाने घाला घातला आणि ही प्रक्रिया खंडित झाली. “दादांची इच्छा होती की दोन्ही पक्ष एकत्र यावेत, ती इच्छा पूर्ण व्हावी हीच आमची भावना आहे,” असेही ते म्हणाले.
राज ठाकरेंचा कडाडून विरोध आणि भविष्यातील आव्हाने-
विशेष म्हणजे, प्रफुल्ल पटेलांकडे पक्षाची सूत्रे जाण्याचा सुगावा लागताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विट करत याला तीव्र विरोध दर्शवला होता. राष्ट्रवादीच्या अंतर्गत कलहाने आता राज्याच्या राजकारणाला वेगळीच दिशा दिली आहे. नव्या पिढीवर आता ही मोठी जबाबदारी असून, लोकांचे दुःख कमी करण्यासाठी आणि जनतेची कामे करण्यासाठी या आव्हानात्मक परिस्थितीला सामोरे जावे लागेल, असा सूर राजकीय विश्लेषकांकडून उमटत आहे.











