Pod Taxi : मुंबईतील प्रमुख व्यावसायिक केंद्र असलेल्या वांद्रे-कुर्ला संकुलातील (BKC) दैनंदिन वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) एक महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले आहे. वांद्रे रेल्वे स्थानक ते कुर्ला रेल्वे स्थानक यादरम्यान धावणाऱ्या ८.८ किलोमीटर लांबीच्या अत्याधुनिक ‘पॉड टॅक्सी’ (Pod Taxi) प्रकल्पाचे भूमिपूजन नुकतेच संपन्न झाले. सार्वजनिक-खाजगी भागीदारी (PPP) तत्त्वावर राबविल्या जाणाऱ्या या प्रकल्पामुळे बीकेसी परिसरातील प्रवासाचा चेहरामोहरा बदलणार असून २०२९ पर्यंत ही सेवा प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे.
प्रकल्पाचे स्वरूप आणि तांत्रिक वैशिष्ट्ये-
बीकेसी परिसरात दररोज अंदाजे ४ ते ६ लाख नागरिक कामानिमित्त ये-जा करतात. रेल्वे स्थानकापासून कार्यालयापर्यंत पोहोचण्यासाठी (Last Mile Connectivity) सध्या रिक्षा आणि बसवर मोठा ताण पडतो. यावर उपाय म्हणून ही पूर्णपणे स्वयंचलित आणि चालकविरहित (Driverless) पॉड टॅक्सी प्रणाली विकसित केली जात आहे. या ८.८ किमीच्या मार्गावर एकूण ३८ स्थानके असतील. एका पॉड टॅक्सीमध्ये एकावेळी ४ ते ६ प्रवासी प्रवास करू शकतील. विशेष म्हणजे, प्रवाशांना फार काळ वाट पाहावी लागू नये यासाठी दर १५ ते ३० सेकंदांच्या अंतराने ही सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. ४० किमी प्रति तास वेगाने धावणाऱ्या या टॅक्सीचे सुरुवातीचे भाडे साधारण २१ रुपये प्रति किलोमीटर राहण्याची शक्यता आहे.
वाहतूक कोंडीतून मुक्तता आणि इतर साधनांशी जोडणी-
सुमारे १ हजार कोटी रुपये खर्चून उभारला जाणारा हा प्रकल्प केवळ बीकेसीमधील अंतर्गत वाहतूक सुलभ करणार नाही, तर तो मेट्रो, बेस्ट बस आणि उपनगरीय रेल्वे सेवांशी देखील जोडला जाणार आहे. यामुळे प्रवाशांना एका वाहतूक साधनातून दुसऱ्या साधनामध्ये बदलणे अत्यंत सोयीचे ठरेल. या प्रकल्पामुळे रस्त्यांवरील खासगी वाहनांची संख्या कमी होऊन प्रदूषण आणि इंधनाची बचत होण्यास मदत होईल, असा विश्वास प्राधिकरणाने व्यक्त केला आहे. प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाल्यापासून तीन वर्षांच्या कालावधीत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
मेट्रो ९ च्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण-
पॉड टॅक्सीच्या भूमिपूजनासोबतच मुंबईकरांसाठी मंगळवारचा दिवस ऐतिहासिक ठरला. दहिसर ते काशीगाव दरम्यानच्या ‘मेट्रो ९’ प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडले. २०१८ मध्ये भूमिपूजन झालेल्या या प्रकल्पाचा पहिला टप्पा आता पूर्ण झाला असून, यामुळे मुंबई आणि मीरा-भाईंदर या शहरांमधील प्रवास अधिक वेगवान आणि सुखकर होणार आहे.











