Buldhana Police Tax Evasion : बुलढाणा (Buldhana) जिल्हा पोलीस दलात आयकर विभागाने (Income Tax Department) केलेल्या मोठ्या कारवाईमुळे संपूर्ण पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. प्राप्तिकर विभागाने जिल्ह्यातील तब्बल 1,050 पोलीस अंमलदारांना गेल्या तीन ते चार वर्षांतील आयकर विवरणपत्रांमध्ये बनावट कपात दाखवून करचोरी केल्याच्या संशयावरून नोटिसा बजावल्या आहेत.
आयकर विभागाने थेट पोलीस अधीक्षक (SP) कार्यालयालाही नोटीस बजावल्याने परिस्थितीचे गांभीर्य वाढले आहे.
करचोरीचा प्रकार आणि सीएचे संगनमत
आयकर विभागाने केलेल्या पडताळणीत असे उघड झाले आहे की, अनेक पोलीस कर्मचाऱ्यांनी कलम 80C अंतर्गत तसेच गृहकर्जावरील व्याज सवलतीसाठी बनावट गुंतवणुकीचे दावे केले. प्रत्यक्षात विमा, पीपीएफ (PPF), म्युच्युअल फंड (Mutual Fund) किंवा गृहकर्ज नसतानाही मोठ्या रकमेच्या कपाती दाखवण्यात आल्या होत्या.
या संपूर्ण प्रक्रियेत एक धक्कादायक बाब समोर आली आहे. या सर्व अधिकाऱ्यांचे आयकर विवरणपत्रे एकाच चार्टर्ड अकाउंटंटद्वारे दाखल करण्यात आले होते. त्यामुळे करचोरीच्या या प्रकारात चार्टर्ड अकाउंटंटचे संगनमत असल्याचा मोठा संशय व्यक्त होत आहे.
बुलढाणा पोलीस अधीक्षक ‘ॲक्शन मोड’वर
या गंभीर प्रकारानंतर बुलढाणा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नीलेश तांबे यांनी कठोर भूमिका घेतली आहे. त्यांनी 6 नोव्हेंबर रोजी सर्व पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या आयकर रिटर्नची त्वरित चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत.
पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट केले आहे की, ज्यांच्या रिटर्नमध्ये चूक आढळून येईल, त्यांनी 10 नोव्हेंबरपर्यंत सुधारित विवरणपत्र दाखल करावे. तसे न केल्यास त्यांच्यावर विभागीय चौकशी सुरू केली जाईल. आयकर विभागाने कोणतीही दंडात्मक कारवाई किंवा खटला दाखल केल्यास त्याची सर्व जबाबदारी संबंधित अधिकाऱ्याची असेल, असेही तांबे यांनी नमूद केले आहे.
हे देखील वाचा – Mohan Bhagwat : ‘मुस्लिम-ख्रिश्चन RSS मध्ये येऊ शकतात; पण…’; मोहन भागवत यांचे महत्त्वाचे विधान









