Pradnya Satav : राज्य निवडणुकांच्या पार्शवभूमीवर राज्याच्या राजकारणात अनेक महत्वपूर्ण बदल होताना दिसत आहेत. यात आपसात युती, किंवा मग एका पक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेश यासगळ्या घडामोडीनां वेग आला आहे. आणि आता अशातच काँग्रेसचे स्वर्गीय नेते राजीव सातव(Rajiv Satav)यांच्या पत्नी आणि विधानपरिषदेच्या आमदार डॉ. प्रज्ञा सातव यांनी आज काँग्रेस आमदारकीचा राजीनामा दिला असून; त्यांनी आपला राजीनामा विधीमंडळ सचिवांकडे सादर केला असून, त्यामुळे त्यांच्या भाजप प्रवेशावर जवळपास शिक्कामोर्तब झालं असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आता काँग्रेसला भाजपने तगडा झटका दिला असल्याचे देखील बोलले जात आहे.
गेल्या काही काळापासून प्रज्ञा सातव यांच्या भाजप प्रवेशाबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगात होती. शिवाय आज त्यांचा भाजपमध्ये अधिकृत प्रवेश होणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे. याशिवाय असे देखील बोलले जात आहे कि पक्षांतर्गत गटबाजीला कंटाळून त्यांनी हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.
दरम्यान, काँग्रेस विधानपरिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी या पक्षप्रवेशात कुठलीहि तथ्यता नसल्याचे म्हटले असले, तरी प्रज्ञा सातव यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे राजकीय हालचालींना वेग आल्याचे दिसत आहे.
स्वर्गीय राजीव सातव यांच्या निधनानंतर काँग्रेसने प्रज्ञा सातव यांना विधानपरिषदेवर संधी देखील दिली होती. राजीव सातव हे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे अत्यंत निकटवर्तीय देखील मानले जात होते. मात्र,कोरोनामध्ये त्यांच्या अकाली निधनामुळे काँग्रेसमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली होती.
प्रज्ञा सातव या आमदारकीचा राजीनामा देण्यासाठी आपल्या समर्थकांसह आल्या आहेत. हिंगोलीतून आलेल्या कार्यकर्त्यांनी प्रज्ञा सातव यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी देखील केली. ‘राजीव सातव अमर रहे’ असे नारे देखील देण्यात आले. हिंगोलीतून मोठ्या प्रमाणात सातव यांचे कार्यकर्ते भाजप कार्यालयात दाखल झाल्याची देखील माहिती आहे.
प्रज्ञा सातव जो निर्णय घेतील त्याला माझ्या शुभेच्छा – सुप्रिया सुळे
राजीव सातव यांच्याशी आमचे प्रचंड जिव्हाळ्याचे संभंध होते. ते गेले तेव्हा प्रचंड दुःख झाले होते. असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. पुढे त्या म्हणतात प्रज्ञा यांचं नक्की काय झालं हे मला माहिती नाही. त्या जो काही निर्णय देतील त्याला माझ्या शुभेच्छा असतील पण खूप जड अंतकरणाने मी या शुभेच्छा देईन कारण काँग्रेसच्या विचारांच प्रेमच या कुटुंबाशी खूप जवळच नातं आहे. ते आमच्या कुटुंबातील लोक आहेत. त्यांनी हा निर्णय का घेतला हि माझ्यासाठी एक आश्चर्याची गोष्ट असल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
नक्की कोण आहेत प्रज्ञा सातव? (Who Is Pradnya Satav)
डॉ. प्रज्ञा सातव या हिंगोलीचे काँग्रेसचे माजी खासदार दिवंगत राजीव सातव यांच्या पत्नी आहेत. राजीव सातव यांनी काँग्रेस पक्षात राष्ट्रीय स्तरावर स्वत:चे स्थान बळकट केले. ते राहुल गांधी यांच्या विश्वासू सहकाऱ्यांपैकी एक म्हणून देखील ओळखले जायचे. २०१४ च्या मोदी लाटेत महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाचे केवळ दोन खासदार निवडून आले होते. त्यामध्ये राजीव सातव यांचा देखील समावेश होता. त्यानंतर मात्र राजीव सातव प्रचंड चर्चेत आले होते. त्यानंतर राजीव सातव यांनी काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्तुळात स्वत:चे स्थान बळकट केले. राजीव सातव यांनी पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, विधानसभा सदस्य, लोकसभा सदस्य, राज्यसभा सदस्य म्हणून देखील काम केले होते. तर युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राष्ट्रीय अध्यक्ष, अखिल भारतीय काँग्रेसचे सरचिटणीस, गुजरातचे प्रभारी आणि काँग्रेस कार्य समितीचे सदस्य अशा विविध जबाबदाऱ्या आणि पदे त्यांनी भुषविली होती.
राजीव सातव हे २०१४ ते २०१९ दरम्यान हिंगोलीचे खासदार होते. गांधी घराण्याच्या अत्यंत जवळचे असलेल्या राजीव सातव यांचं २०२१ मध्ये आजारपणामुळे दुर्दैवी निधन झाले. प्रज्ञा सातव या महाराष्ट्र राज्य काँग्रेस समितीच्या उपाध्यक्ष असून सध्या विधान परिषदेच्या आमदार देखील आहेत. काँग्रेस नेते शरद रणपिसे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर २०२१ साली विधानपरिषदेवर बिनविरोधी त्यांची निवड झाली होती. प्रज्ञा सातव या पहिल्यांदा २०२१ मध्ये पोटनिवडणुकीत बिनविरोध निवडून आल्या होत्या. त्यानंतर २०२४ मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसकडून दुसऱ्यांदा विधानपरिषदेवर त्या निवडून आल्या होत्या.
हे देखील वाचा – India e-Passport : भारतात ई-पासपोर्टची सुरुवात! जाणून घ्या अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया









