Praful Patel : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या वावटळीसारख्या वेगाने फिरणाऱ्या अफवांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) राष्ट्रीय अध्यक्षपदी खासदार प्रफुल्ल पटेल यांची वर्णी लागल्याची खळबळजनक माहिती केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांनी एका मुलाखतीत दिली होती. मात्र, या वृत्ताने राजकीय वर्तुळात वादळ निर्माण होताच, खुद्द प्रफुल्ल पटेल यांनी समोर येत या सर्व बातम्यांचे खंडन केले आहे.
“त्या बातम्या निराधार”; पटेलांचे थेट प्रतिपादन-
माध्यमांमध्ये आणि राजकीय वर्तुळात आपल्या नावाची चर्चा सुरू झाल्यानंतर प्रफुल्ल पटेल यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली भूमिका स्पष्ट केली. “माझी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याचे वृत्त माझ्या निदर्शनास आले आहे, परंतु हे वृत्त पूर्णपणे निराधार असून त्यात कोणतेही तथ्य नाही,” असे त्यांनी अत्यंत ठामपणे नमूद केले. या एका विधानामुळे गेल्या २४ तासांपासून सुरू असलेल्या चर्चांना आता पूर्णतः वेगळे वळण मिळाले आहे.
प्रफुल्ल पटेल यांनी आपल्या स्पष्टीकरणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यपद्धतीवर प्रकाश टाकला. ते म्हणाले की, “आमचा पक्ष ही एक लोकशाही मूल्यांवर चालणारी संस्था आहे. इतक्या मोठ्या आणि महत्त्वाच्या पदाबाबतचा निर्णय हा केवळ एका व्यक्तीचा किंवा अचानक घेतलेला नसतो. पक्षाचे ज्येष्ठ नेते, सन्माननीय आमदार आणि समर्पित पदाधिकारी यांच्याशी सखोल सल्लामसलत केल्यानंतरच अंतिम निर्णय घेतला जातो.” कार्यकर्त्यांच्या सामूहिक इच्छेचा आदर राखणे ही पक्षाची परंपरा असल्याचेही त्यांनी यावेळी अधोरेखित केले.
राज ठाकरेंचा विरोध आणि राजकीय पार्श्वभूमी-
विशेष म्हणजे, पियूष गोयल यांच्या विधानानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी समाजमाध्यमांवरून या संभाव्य निवडीला कडाडून विरोध दर्शवला होता. राज्याच्या राजकारणात यावरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात असताना पटेलांनी घेतलेली ही सावध भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. पियूष गोयल यांनी जरी सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाचे कौतुक करून पटेलांच्या नावाला दुजोरा दिला होता, तरी प्रफुल्ल पटेल यांनी “ठरलेली आणि पारदर्शक प्रक्रिया” पाळण्यावर भर दिला आहे.
अजितदादांच्या वारशाचा पेच कायम-
अजित पवार यांच्या पश्चात पक्षाचे भविष्य कोणाच्या हाती असेल, हा प्रश्न अजूनही अनुत्तरितच राहिला आहे. पटेलांच्या स्पष्टीकरणामुळे तूर्तास तरी अध्यक्षपदाचा पेच सुटलेला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. पक्ष आता नवीन अध्यक्षाच्या निवडीसाठी कोणती पावले उचलतो आणि यामध्ये शरद पवार यांची नेमकी भूमिका काय असेल, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले आहे.











