Prahar Protest : राज्यात सर्वत्र बिबट्याची दहशत आहे. अहिल्यानगर परिसरात देखील बिबट्याने उच्छाद मांडल्याने नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्याच्या हल्ल्यामध्ये नागरिक, इतर प्राणी मृत्युमुखी पडत असताना वन विभाग बिबट्याचा बंदोबस्त करण्यात अपयशी ठरले. त्यामुळे याचा निषेध करण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आज, शहरातील वनविभागाच्या कार्यालयात खेकडे सोडण्याचे अनोखे आंदोलन केले. सुमारे १०० हून अधिक खेकडे वन विभागाच्या कार्यालयाच्या गेटवर सोडले गेले. त्यामुळे तेथील उपस्थितांची चांगलीच धावपळ उडाली.
भिंगार कॅम्प पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या प्रहार आणि एकलव्य संघटनेच्या कार्यकर्त्यांना सुरवातीला ताब्यात घेतले होते. आणि त्यानंतर त्यांना सोडून दिले. आंदोलनासाठी कार्यकर्त्यांनी काल, गुरूवारी रात्रीच खेकडे जमा करून ठेवले होते.
आंदोलनासंदर्भात माहिती देताना प्रहार पक्षाचे जिल्हाध्यक्ष परदेशी यांनी याबद्दल अधिक सांगितले आहे. नगर शहर व लगतच्या निंबोडी, खारे कर्जुने, निंबळक, जेऊर, भिंगार, चांदबीबी महाल परिसरात नागरिकांनी अनेक ठिकाणी बिबट्याचा मुक्त संचार पाहिला. खारेकर्जूनेमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात एका मुलीचा मृत्यू देखील झाला होता. जिल्ह्यातही अनेक ठिकाणी बिबट्याचा उपद्रव अधिक प्रमाणात वाढला आहे.
त्यामुळे बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभागाला प्रहार पक्षातर्फे याआधी निवेदन देण्यात आले होते. मात्र वन विभागाने त्याकडे मात्र दुर्लक्ष केले. आता जिल्ह्यात अनेक ठिकाणी बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना लागोपाठ घडतच राहिल्या. त्यामुळेच प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केले.
हे देखील वाचा –
Vietnam Floods : व्हिएतनाममध्ये पूरस्थिती अजूनही कायम; पुरात अद्याप ४१ जणांना गमवावे लागले प्राण









