Prashant Jagtap : आगामी पालिकांच्या निवडणुकांच्या पार्शवभूमीवर राज्यातील राजकारणात लक्षणीय बदल होताना दिसत आहेत. गेल्या काही दिवसांपासून पुणे शरद पवार गटात निर्माण झालेल्या राजकीय चर्चांवर अखेर पडदा पडल्याचे चित्र सध्या दिसत आहे. या सगळ्यावर नाराज असणारे पुण्याचे माजी महापौर आणि शरद पवार गटाचे माजी शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी आज काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला.
आज सकाळीच आपल्याला एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही पक्षांकडून ऑफर असल्याचे प्रशांत जगताप यांनी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये सांगितले. पुढच्या तीन ते चार तासांत यासंदर्भात अंतिम निर्णय घेणार असल्याचे देखील प्रशांत जगताप यांनी म्हटलं होतं.
अखेर ह्या संदर्भातील निर्णय त्यांनी घेतला असून एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोघांचीही विनंती न जुमानता प्रशांत जगताप यांनी थेट काँग्रेसमध्ये एन्ट्री घेतली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, नेते विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत त्यांचा हा जाहीर पक्षप्रवेश पार पडला.
उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि शरद पवार (Sharad Pawar) यांची राष्ट्रवादी एकत्र आल्याने शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते प्रशांत जगताप हे प्रचंड नाराज होते. त्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा राजीनामा देणारे पुण्याचे माजी महापौर प्रशांत जगताप (Prashant Jagtap) आज काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे जवळपास निश्चित झालं होते. या आधी ते ठाकरे गटात जाणार असल्याच्या चर्चाना देखील जोरदार उधाण आले होते. पण त्यांच्या या निर्णयाने सर्व प्रश्नांना पूर्णविराम मिळाला आहे.
कोण आहेत प्रशांत जगताप?
प्रशांत जगताप यांनी १९९९ पासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कामाला सुरुवात केली होती. त्यांनी पुणे महानगरपालिकेत प्रदीर्घ काळ नगरसेवक म्हणून काम केले असून, ते वानवडी प्रभागातून निवडून येत आहेत. २०१६-१७ या कालावधीत त्यांनी पुणे शहराचे महापौर पदाची धुरा सांभाळली आहे. २०२१ मध्ये त्यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे शहराध्यक्षपदी नियुक्ती केली गेली.
२०२३ मध्ये पक्षात फूट पडल्यानंतर त्यांनी शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील शरदचंद्र पवार गटात राहण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत हडपसर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडून निवडणूक देखील लढवली होती. शरद पवारांचे एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून देखील प्रशांत जगताप यांची पुण्यात ख्याती होती.









