Sharad pawar- मुंबई महापालिका निवडणुकीत मनसेच्या मुद्द्यावर निर्माण झालेला तणाव निवळण्यासाठी जेष्ठ नेते शरद पवार (Sharad pawar) यांनी मविआची सर्व सूत्रे आपल्या हाती घेतली आहेत. उबाठा आणि काँग्रेसमध्ये मनसेला आघाडीत घेण्यावरून मतभेद वाढल्यानंतर पवारांनी दोन्ही पक्षांना एकत्र आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. भाजपाला मुंबई महापालिकेपासून दूर ठेवणे हे एकमेव टार्गेट ठेऊन त्यांनी काँग्रेस वरिष्ठांसोबत चर्चा करून मुंबई काँग्रेसची समजूत काढण्याचा निर्धार केल्याची माहिती आहे. मनसे सत्ताधाऱ्यांकडे गेल्यास मराठी मतांची फाटाफूट होऊन भाजपाला फायदा होईल, त्यामुळे मनसेला मविआत आणणे गरजेचे आहे असे त्यांचे मत असल्याची माहिती आहे.
मुंबई काँग्रेसने निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला आहे आणि मनसेसोबत जाण्यास त्यांनी नकार दिला आहे. गरीबांवर मारझोड करणाऱ्या मनसेसोबत जाणे काँग्रेसच्या विचारसरणीत बसत नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे उबाठा आणि काँग्रेसमध्ये अंतर वाढले आहे. त्यामुळे आघाडीला धक्का बसण्याची स्थिती निर्माण झाली आहे. ही परिस्थिती हाताळण्यासाठी आणि मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना सोबत घेण्याच्या मुद्यावर शरद पवार लवकरच दिल्लीतील काँग्रेस वरिष्ठांसोबत चर्चा करणार आहेत.
भाजपाला रोखण्यासाठी मुंबईत मनसेचा जनाधार महत्त्वाचा असल्याचे शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही सांगितले असून मनसे, समाजवादी पक्ष आणि डाव्या पक्षांनाही सोबत घेण्याचा आग्रह त्यांनी धरला आहे. मुंबईच्या २२७ पैकी ७० जागा मनसेला देण्याचा प्रस्ताव ठाकरे गटाकडून मांडण्यात आला असल्याची माहिती आहे, तर उर्वरित जागांवर उबाठा, काँग्रेस, शरद पवार गट आणि समाजवादी पार्टी उमेदवार उभे करतील. शरद पवारांच्या हस्तक्षेपानंतर मविआ टिकून राहण्याची आणि मुंबईत भाजपाला रोखण्यासाठी विरोधकांची वज्रमुठ पुन्हा एकत्र येण्याची शक्यता वाढली आहे.
——————————————————————————————————————————————————
हे देखील वाचा
पुण्यात अजित पवार यांचा आणखी एक भूखंड घोटाळा ? ५०० कोटींची जमीन २९९ कोटींना विकली









