मुंबई- अभिनेता, दिग्दर्शक व यशस्वी निर्माता धीरज कुमार (actor dhiraj kumar) यांचे आज सकाळी ११ वाजून ४० मिनिटांनी मुंबईच्या कोकिलाबेन रुग्णालयात (Kokilaben Hospital) निधन झाले. ते ८० वर्षांचे होते. काल रात्री त्यांना न्युमोनियाचा (Pneumonia) त्रास होत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची तब्येत अधिक बिघडल्यानंतर त्यांना जीवरक्षक प्रणालीवर ठेवण्यात आले होते. आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. धीरज कुमार यांच्या पार्थिवावर उद्या सकाळी मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
धीरज कुमार यांचा जन्म १ ऑक्टोबर १९४४ रोजी पंजाबमध्ये झाला. १९६५ साली युनायटेड प्रोड्यूसर च्या वतीने आयोजित केलेल्या एका स्पर्धेत ते शेवटच्या फेरीत पोहोचले. याच स्पर्धेत राजेश खन्ना पहिला आला होता. त्यात सुभाष घई यांचाही समावेश होता. त्यांनी हिंदी बरोबरच २१ पंजाबी चित्रपटांमध्ये भूमिका केल्या. स्वामी, हिरा पन्ना, रातों का राजा असे त्यांचे काही चित्रपट होते. अभिनयापेक्षाही त्यांना मालिका निर्माता म्हणून अधिक यश मिळाले. त्यांनी अदालत, ओम नमः शिवाय, जाने अनजाने, सिंहासन बत्तीसी आदी अनेक मालिका केल्या. त्या भरपूर गाजल्या. त्यांनी काही चित्रपटांचीही निर्मिती केली. त्यांच्या जाण्याने हिंदी चित्रपट सृष्टीवर शोककळा पसरली आहे. मितभाषी व सर्वांशी मिळून मिसळून वागणारे निर्माते अशी त्यांची ख्याती होती. त्यांच्या क्रिएटिव्ह आय या निर्मिती संस्थेच्या वतीने तब्बल ३० मालिकांची निर्मिती केली होती.