SC grants anticipatory bail to Puja Khedkar | सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) काल (21 मे) माजी आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकरला (Puja Khedkar) अटकपूर्व जामीन मंजूर केला. खेडकरवर नागरी सेवा परीक्षेत फसवणूक आणि ओबीसी व दिव्यांग कोट्याचा चुकीच्या पद्धतीने लाभ घेतल्याचा आरोप आहे.
न्यायमूर्ती बी. व्ही. नागरथना आणि न्यायमूर्ती सतीश चंद्र यांच्या खंडपीठाने खेडकरला जामीन मंजूर केला. तसेच, “तिने सर्व काही गमावले आहे आणि तिला आता कुठेही नोकरी मिळणार नाही.”, असे मतही व्यक्त केले.
दिल्ली पोलिसांनी तिच्या जामीन अर्जाला विरोध केला होता, मात्र न्यायमूर्ती नागरथना यांनी तोंडी टिप्पणी करताना म्हटले, “तिने कोणता गंभीर गुन्हा केला आहे? ती ड्रग लॉर्ड किंवा दहशतवादी नाही. तिने खून केलेला नाही. ती एनडीपीएस कायद्याची गुन्हेगार नाही…” दिल्ली उच्च न्यायालयाने तिचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर खेडकरने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.
सर्वोच्च न्यायालयाने तिचा अटकपूर्व जामीन मंजूर करताना आदेश दिला, “रेकॉर्डवरील परिस्थिती विचारात घेता, आमच्या मते, अपीलकर्त्याला भारतीय नागरिक सुरक्षा संहिते, 2023 च्या कलम 482 अंतर्गत मागितलेला दिलासा मिळण्यास हक्क आहे. त्यामुळे, आम्ही हे अपील मंजूर करतो आणि उच्च न्यायालयाने 23.12.2024 रोजी दिलेला आदेश रद्द करतो.”
सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिले की, “अपीलकर्त्याला अटक झाल्यास, अटक करणाऱ्या अधिकाऱ्याने अपीलकर्त्याला 25,000 रुपयांच्या रोख हमीवर आणि तितक्याच रकमेच्या दोन जामीनादारांच्या आधारावर जामिनावर सोडावे.”
सर्वोच्च न्यायालयाने खेडकरला “सुरू असलेल्या तपासात पूर्ण सहकार्य करण्याचे” आणि “आपल्या स्वातंत्र्याचा गैरवापर न करण्याचे तसेच साक्षीदारांवर कोणताही दबाव न आणण्याचे किंवा रेकॉर्डवरील पुराव्यांशी छेडछाड न करण्याचे” निर्देश दिले आहे. न्यायालयाने म्हटले की, “या अटींचे उल्लंघन झाल्यास, अटकपूर्व जामीन रद्द करण्याची मागणी करण्याचा हक्क असेल.”
दिल्ली पोलिसांनी भारतीय दंड संहिता, माहिती तंत्रज्ञान कायदा आणि दिव्यांग व्यक्तींच्या हक्कांचा कायदा अंतर्गत एफआयआर (FIR) दाखल केला होता.
खेडकरच्या तिने ज्येष्ठ वकील सिद्धार्थ लुथरा यांनी सांगितले की, जुलै 2024 पासून तपास सुरू आहे आणि त्यांनी त्यांच्या क्लायंटने तपासात पूर्ण सहकार्य केल्याचा हवाला देत अटकपूर्व जामिनाची मागणी केली होती. तसेच, दिल्ली पोलिसांनी तपासात सहकार्य करत नसल्याचे सांगत जामिनाला विरोध केला होता.