Pune Election AB Form Controversy : पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या धामधुमीत सध्या एका अजब घटनेची चर्चा संपूर्ण राज्यात रंगली आहे. प्रभाग क्रमांक 36 (अ) मध्ये उमेदवारीवरून झालेल्या वादातून एका उमेदवाराने चक्क प्रतिस्पर्धी उमेदवाराचा ‘एबी फॉर्म’ हिसकावून तो फाडून गिळून टाकला.
ही घटना धनकवडी-सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयात अर्ज छाननी प्रक्रियेदरम्यान घडली, ज्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांसह सर्वच थक्क झाले.
नेमका प्रकार काय घडला?
प्रभाग क्रमांक 36 (अ) मध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडून चुकून दोन उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात आले होते. यामध्ये उद्धव कांबळे आणि मच्छिंद्र ढवळे या दोघांचा समावेश होता. मच्छिंद्र ढवळे यांनी पक्षाच्या अधिकृत एबी फॉर्मसह आधीच अर्ज दाखल केला होता. जेव्हा ही बाब उद्धव कांबळे यांच्या लक्षात आली, तेव्हा त्यांनी क्षेत्रीय कार्यालयात जाऊन अर्जांचा गठ्ठा पाहण्यासाठी मागितला.
नियमानुसार तो अधिकार असल्याने कर्मचाऱ्यांनी त्यांना अर्ज दिले, मात्र कांबळे यांनी अचानक ढवळे यांचा एबी फॉर्म फाडला आणि कोणालाही काही समजायच्या आत तो तोंडात कोंबून गिळून टाकला.
पोलिस कारवाई आणि स्पष्टीकरण
या घटनेनंतर सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीवरून उद्धव कांबळे यांच्यावर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरकारी कामकाजात अडथळा आणणे आणि कागदपत्रे नष्ट करणे या कलमान्वये ही कारवाई झाली.
दरम्यान, कांबळे यांनी आपण फॉर्म खाल्ला नसल्याचा दावा केला असून मेडिकल तपासणी करण्याची मागणी केली आहे. “पक्षाने मलाच उमेदवारी दिली आहे, मात्र अधिकाऱ्यांनी खोटे सांगितल्याने मी संतापलो होतो,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
निवडणुकीत ‘ए’ आणि ‘बी’ फॉर्मचे महत्त्व काय?
महत्त्व: या दोन अर्जांमुळेच एखादा उमेदवार पक्षाचा अधिकृत प्रतिनिधी मानला जातो, अन्यथा त्याला अपक्ष म्हणून निवडणूक लढवावी लागते.
‘ए’ फॉर्म: या अर्जात राजकीय पक्षाकडून अधिकृत उमेदवाराचे नाव, जात, उत्पन्न आणि त्याच्यावरील गुन्ह्यांचा तपशील असतो. यावर पक्षाच्या अध्यक्षांची स्वाक्षरी आवश्यक असते.
‘बी’ फॉर्म: हा अर्ज निवडणूक चिन्हासाठी महत्त्वाचा असतो. यात अधिकृत उमेदवारासह एका पर्यायी उमेदवाराचे नावही असते. जर पहिल्या उमेदवाराचा अर्ज बाद झाला, तर दुसऱ्याला संधी मिळते.
हे देखील वाचा – Municipal Corporation Election 2026 : निवडणुकांआधीच महायुतीचा गुलाल! राज्यातील 8 महापालिकांमध्ये 22 उमेदवार बिनविरोध; भाजपची मोठी मुसंडी














