Pune Election 2026 : महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात राजकीय घडामोडींना विलक्षण गती प्राप्त झाली असून, उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुकांमध्ये मोठी धावपळ सुरू झाली आहे. या चुरशीच्या वातावरणात पुण्यातील कुप्रसिद्ध आंदेकर टोळीचा म्होरक्या थेट निवडणुकीच्या रणांगणात उतरल्याने राजकीय क्षेत्रात एकच खळबळ माजली आहे. या अनपेक्षित घडामोडीमुळे निवडणूक प्रक्रियेभोवती नव्या चर्चांना आणि तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
काल एक वेगळेच दृश्य पाहायला मिळाले. हातात बेड्या आणि गळ्यात दोरखंड अशा प्रतीकात्मक अवस्थेत कुख्यात आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर मोठ्या आवाजात घोषणाबाजी करत महापालिका निवडणुकीसाठी भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्यास गेला. मात्र, अर्ज अपूर्ण असल्याने तो स्वीकारण्यात आला नाही.
याशिवाय बंडू आंदेकर यांची भावजय लक्ष्मी उदयकांत आंदेकर आणि सून सोनाली वनराज आंदेकर यांनी सादर केलेल्या उमेदवारी अर्जांमध्येही अनेक तांत्रिक त्रुटी आढळून आल्याने ते देखील नामंजूर करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी आंदेकर कुटुंबाकडून पुन्हा एकदा अर्ज दाखल करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत कल्याणी कोमकर यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली. आंदेकर कुटुंबातील कोणालाही कोणत्याही परिस्थितीत उमेदवारी देऊ नये, अशी ठाम मागणी त्यांनी केली. त्यांच्या म्हणण्यानुसार, बंडू आंदेकर यांच्यामुळे अनेक कुटुंबांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले असून, अशा व्यक्तींना राजकीय व्यासपीठ देणे समाजासाठी घातक ठरेल.
अजित पवार गटाने जर आंदेकर कुटुंबाला उमेदवारी दिली, तर मी थेट पक्ष कार्यालयासमोर आत्मदहन करेन असा इशाराही त्यांनी दिला. विजय निंबाळकर, गणेश काळे आणि निखिल आखाडे यांच्या हत्यांमागे आंदेकर टोळीचाच सहभाग असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. बंडू आंदेकर पुण्याच्या विकासाचे दावे करतात; मात्र असा विकास निरपराधांच्या बळीवर आधारित असेल, तर तो स्वीकारार्ह कसा ठरेल, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. समाजाचे भवितव्य घडवण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, त्यांनीच जर कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त केले असतील, तर अशा व्यक्तींनी विकासाची भाषा करणेच विसंगत ठरते, असे मत त्यांनी व्यक्त केले.
आयुष कोमकर हत्या प्रकरणात बंडू आंदेकर सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. विशेष न्यायालयाने बंडू आंदेकर तसेच त्यांच्या कुटुंबातील लक्ष्मी उदयकांत आंदेकर आणि सोनाली वनराज आंदेकर यांना आगामी महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सशर्त परवानगी दिली आहे. मात्र, अर्ज सादर करताना कोणत्याही प्रकारची मिरवणूक, भाषण किंवा घोषणाबाजी करण्यास न्यायालयाने स्पष्ट मनाई केली आहे.
तथापि, उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी कार्यालयात जाताना बंडू आंदेकर याने विविध घोषणा देत प्रवेश केल्याचे आढळून आले. शनिवारी बंडू आंदेकर, लक्ष्मी उदयकांत आंदेकर आणि सोनाली वनराज आंदेकर हे पोलिस बंदोबस्तात भवानी पेठेच्या क्षेत्रीय कार्यालयात आले होते. मात्र, सादर करण्यात आलेले उमेदवारी अर्ज अपूर्ण असल्याने ते स्वीकारण्यात आले नाहीत.
निवडणूक प्रक्रियेनुसार अर्ज दाखल करण्यासाठी अद्याप तीन दिवसांची मुदत उपलब्ध असून, या कालावधीत संबंधित उमेदवारांना पुन्हा अर्ज सादर करता येईल, अशी माहिती भवानी पेठे क्षेत्रीय कार्यालयाचे निवडणूक निर्णय अधिकारी कल्याण पांढरे यांनी दिली.
प्रकरण नेमकं काय?
माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचा नातेवाईक असलेल्या गणेश कोमकर याचा मुलगा आयुष कोमकर याची गोळ्या घालून निर्घृण हत्या करण्यात आली होती. आणि या हत्येनंतर आंदेकर टोळीतील वाद अधिक चिघळला. या प्रकरणात बंडू उर्फ सूर्यकांत राणोजी आंदेकर याच्यासह १३ जणांविरोधात खून आणि मकोका अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
आयुष कोमकर हत्येचा थरारक घटनाक्रम
५ सप्टेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास आयुष कोमकर हा आपल्या लहान भावाला वर्गातून घेऊन सुमारे साडेसातच्या वेळेस नाना पेठेतील हमाल तालमीजवळ असलेल्या एका सोसायटीत आला होता. त्यानंतर तळमजल्यावर दुचाकी उभी करत असताना त्याच्यावर पिस्तुलातून गोळीबार करण्यात आला आणि या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर आयुषच्या आई कल्याणी कोमकर यांनी समर्थ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. गुन्हा नोंद झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू करून बंडू आंदेकरसह त्याच्या काही साथीदारांना बुलढाणा परिसरातून अटक केली.
या घटनेनंतर आंदेकर टोळीतील पाच आरोपी काही काळ फरार झाले होते. मात्र, गुन्हे शाखेची विशेष पथके त्यांच्या शोधासाठी सातत्याने कार्यरत होती. आयुष कोमकर खून प्रकरणात कुख्यात गुंड बंडू आंदेकर याच्यासह एकूण १३ आरोपींविरोधात मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली असून, या सर्वांना अटकही करण्यात आली होती.
या प्रकरणातील आरोपी आणि बंडू आंदेकर याचा मुलगा कृष्णा उर्फ कृष्णराज आंदेकर हा आयुषच्या हत्येनंतर पसार झाला होता. मात्र, काही दिवसांनी त्याने स्वतःहून समर्थ पोलीस ठाण्यात हजर राहून चौकशीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला.
हे देखील वाचा – विसरून जाल स्प्लेंडर आणि प्लॅटिना! Honda Shine 100 मध्ये मिळतात पॉवरफुल फीचर्स; जाणून घ्या का आहे ही गाडी खास?









