Pune Free Chicken: निवडणुकीपूर्वी पुणेकरांना खास ‘चिकन ऑफर’! ‘आखाडा’ निमित्त 5000 किलो मोफत चिकन वाटप

Pune Free Chicken

Pune Free Chicken | पुण्यात नेमकं कधी कोण काय करेल काही सांगता येत नाही. श्रावण सुरू होण्याआधी आखाडाच्या निमित्ताने याचीच प्रचिती पाहायला मिळाली. पुण्यातील धानोरी येथे आखाडाचा शेवटचा रविवार (20 जुलै) असल्याने चक्क 5000 किलो चिकनचे मोफत वाटप करण्यात आले.

पुढील काही महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पार पडणार आहे. त्यानिमित्ताने मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध कार्यक्रम राबवले जातात. अशाच प्रकारे आखाड्याचा शेवटचा रविवार साधत धनंजय भाऊ जाधव फाउंडेशनने तब्बल 5000 किलो मोफत चिकन वाटपाचं आयोजन केलं. या उपक्रमाला पुणेकरांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला असून, दुकानांसमोर रांगा लागल्याचा पाहायला मिळाले.

हा उपक्रम धनंजय जाधव आणि पूजा जाधव यांच्या पुढाकारातून पार पडला. आगामी स्थानिक निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून मतदारांशी थेट संपर्क साधण्यासाठी हा प्रयत्न असल्याचं बोललं जात आहे.

5000 किलो चिकनसाठी पुणेकरांची प्रचंड गर्दी

श्रावण महिन्याच्या पूर्वसंध्येला अनेक कुटुंबांत खास मांसाहारी जेवण केले जाते. याच पार्श्वभूमीवर मोफत चिकन मिळणार असल्याचं कळताच नागरिकांनी दुकानांवर धाव घेतली. प्रारंभी चिकन देताना ओळखपत्र तपासण्याची अट होती, जेणेकरून केवळ धनोरी परिसरातील रहिवाशांनाच लाभ मिळावा. मात्र, गर्दी वाढत गेल्यानं ओळख तपासणी थांबवावी लागली. काही ठिकाणी गोंधळामुळे वाटप थांबवण्याची वेळही आली.

“लोकांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून मन भरून आलं. आम्ही एवढा प्रतिसाद अपेक्षितच केला नव्हता. मध्यमवर्गीय आणि गरजू कुटुंबांना थोडासा आधार मिळावा, एवढीच भावना होती,” असं पूजा जाधव यांनी सांगितलं.

मात्र, अशाप्रकारे तब्बल 5000 किलो चिकनचे मोफत वाटप करण्यात आल्याने सर्वत्र याची चर्चा रंगल्याचे पाहायला मिळाले.