Home / महाराष्ट्र / Pune Traffic Alert: पुणेकरांनो लक्ष द्या! आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेमुळे आज मध्यभागातील रस्ते बंद; ‘या’ मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

Pune Traffic Alert: पुणेकरांनो लक्ष द्या! आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेमुळे आज मध्यभागातील रस्ते बंद; ‘या’ मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

Pune Traffic Alert: पुणे शहर आज एका मोठ्या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेचे यजमानपद भूषवत आहे. ‘पुणे ग्रँड चॅलेंज टूर’ या स्पर्धेच्या...

By: Team Navakal
Pune Traffic Alert
Social + WhatsApp CTA

Pune Traffic Alert: पुणे शहर आज एका मोठ्या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेचे यजमानपद भूषवत आहे. ‘पुणे ग्रँड चॅलेंज टूर’ या स्पर्धेच्या निमित्ताने शहराच्या मध्यभागातील प्रमुख रस्त्यांवरील वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. ४० देशांतील १७१ स्पर्धक या शर्यतीत सहभागी होत असून, ही स्पर्धा सुरक्षितपणे पार पडण्यासाठी प्रशासनाने सोमवारी सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत महत्त्वाचे रस्ते बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

हे रस्ते राहतील बंद

आज होणाऱ्या ‘प्रोलॉग’ स्पर्धेसाठी खालील प्रमुख मार्गांवर सर्वसामान्य वाहनांना प्रवेशबंदी असेल:

  • नामदार गोपाळ कृष्ण गोखले रस्ता (फर्ग्युसन कॉलेज रस्ता)
  • जंगली महाराज रस्ता
  • गणेशखिंड रस्ता आणि त्या जोडणारे सर्व उपरस्ते

स्पर्धेचा मार्ग खंडोजी बाबा चौक, गुडलक चौक, तुकाराम महाराज पादुका चौक, संचेती चौक आणि डेक्कन जिमखाना असा असल्याने या परिसरातील जनजीवन प्रभावित होणार आहे.

अत्यावश्यक सेवांना सवलत

ही बंदी केवळ खाजगी आणि व्यावसायिक वाहनांसाठी आहे. रुग्णवाहिका, अग्निशमन दलाचे बंब, पोलिसांची वाहने आणि इतर आपत्कालीन सेवांना या मार्गावरून जाण्याची परवानगी असेल. तसेच, स्पर्धा मार्गावर दोन्ही बाजूंना ‘नो-पार्किंग’ लागू करण्यात आली असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कारवाई केली जाईल.

वाहनचालकांसाठी पर्यायी मार्ग

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पुणे पोलिसांनी एक वर्तुळाकार (Circular) पर्यायी मार्ग निश्चित केला आहे:

  • स्वारगेट – सारसबाग – नळस्टॉप – सेनापती बापट रस्ता – रेंजहिल – खडकी – जुना मुंबई-पुणे रस्ता – पाटील इस्टेट – संगम पूल – आरटीओ – शाहीर अमर शेख चौक – नेहरू रस्ता – स्वारगेट.

नागरिकांनी शक्यतो मध्यभागातील गर्दीच्या रस्त्यांचा वापर टाळावा आणि पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी केले आहे.

पुढील टप्प्यांचे नियोजन

ही स्पर्धा १९ ते २४ जानेवारी दरम्यान विविध टप्प्यांत पार पडणार आहे. याचा एक महत्त्वाचा टप्पा २३ जानेवारी रोजी पुणे आणि पिंपरी-चिंचवड दरम्यान होईल. ९९ किलोमीटरच्या या शर्यतीचा प्रारंभ बालेवाडीतील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातून होईल आणि समारोप जंगली महाराज रस्त्यावरील झाशीची राणी लक्ष्मीबाई चौकात होणार आहे.

Web Title:
संबंधित बातम्या