Pune Jain Boarding : शेठ हिराचंद नेमचंद स्मारक ट्रस्ट ही १९५८ मध्ये स्थापन झालेली सार्वजनिक धर्मादाय संस्था आहे. संस्थेच्या ताब्यात मॉडेल कॉलनी येथील सुमारे १२ हजार चौरस मीटर क्षेत्रफळ असणारा (तीन एकर) भूखंड आहे. या जागेवर गेल्या अनेक वर्षांपासून शेठ हिराचंद नेमचंद दिगंबर जैन बोर्डिंग आणि श्री १००८ भगवान महावीर दिगंबर जैन मंदिर अस्तित्वात आहे. मात्र, ट्रस्टच्या संपत्तीबाबत काही विश्वस्त, राजकीय नेते, बांधकाम व्यावसायिक आणि प्रशासकीय अधिकारी यांनी संगनमत करून २३० कोटींना जमिनीचा परस्पर व्यवहार केला आहे. ही जागा गोखले डेव्हलपर्सला विकल्याचे उघड झाले आहे.
शेठ हिराचंद नेमचंद जैन दिगंबर बोर्डिंगच्या (जैन बोर्डिंग) कागदपत्रातून मंदिर गायब केले गेले,असा कोणत्या प्रकारचा विकास साध्य करण्याचे आपण प्रयत्न करीत आहात, तुम्हाला धर्माचा नाशच करायचा आहे. तुम्ही आमचे मंदिर विकले. हे ट्रस्टचे कर्तव्य आहेत का ? असं जैन मुनी आचार्य श्री गुप्ती नंदीजी महाराज यांनी ट्रस्टी जयंत नांदुरकर संताप व्यक्त करत सुनावले आहे. यावेळी त्यांनी या कारस्थानात सहभागी असलेल्या सर्वांचा विनाश होईल, अशी तीव्र प्रतिक्रिया देखील वर्तवली आहे.
विश्वस्तांच्या या निर्णयाविरोधात एकत्र येत जैन समाजातील बांधवानी जैन बोर्डिंग बचाव कृती समितीच्या माध्यमातून आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. मुख्यमंत्र्यांनी तातडीने लक्ष घालून शेठ हिराचंद नेमचंद जैन दिगंबर बोर्डिंगच्या जागेचा वादग्रस्त व्यवहार येत्या पंधरा दिवसांत रद्द करावा, अन्यथा आमरण उपोषण करू असा इशारा आचार्य श्री गुप्ती नंदीजी महाराज यांनी दिला होता.
या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ट्रस्टी जयंत नांदुरकर हे शुक्रवारी बोर्डिंगचे रेक्टर सुरेंद्र गांधी यांच्या कार्यालयात देखील आले होते. ही बाब आचार्य श्री गुप्ती नंदीजी महाराज आणि जैन बांधवांना समजल्यानंतर सर्वजण तातडीने गांधी यांच्या कार्यालयाकडे गेले आणि त्यांनी नांदुरकर व गांधी यांना घेराव घातला. यावेळी आचार्य श्री गुप्ती नंदीजी महाराज यांनी नांदुरकर यांना चांगलेच सुनावले देखील.
एक तारखेच्या आधी हा व्यवहार रद्द झाला नाही तर संपूर्ण देशभर मोठे आंदोलन करू, याची ट्रस्टीने दखल घ्यावी, असा इशाराही आचार्य श्री गुप्ती नंदीजी महाराज यांनी यावेळी दिला. त्यानंतर याच जैन बोर्डिंग घोटाळा प्रकरणात पुण्याचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर सातत्यानं आरोप होत आहेत. शिवसेना शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर यांनी या प्रकरणात आक्रमक भूमिका घेत, ते वारंवार मुरलीधर मोहोळ यांच्यावर आरोप करत आहेत. त्यामुळे आता मुरलीधर मोहोळ यांच्या अडचणी वाढ होताना दिसत आहे. या आरोपांनंतर पहिल्यांदाच खासदार मुरलीधर मोहोळ हे जैन बोर्डिंग या ठिकाणी गेले होते, त्यांनी जैनमुनींची भेट देखील घेतली आहे.
मुरलीधर मोहोळ म्हणतात मी या प्रकरणात सहभागी आहे, किंवा माझे कोणीतरी सहभागी आहे असे आरोप केले जात आहेत. परंतु माझा यामध्ये कोणत्याही प्रकारचा सहभाग नाही, हे मी वारंवार पुराव्यानिशी स्पष्ट केले आहे. प्रत्येक समाजाचे गुरू असतात ते सर्वांसाठी आदरणीय असतात. त्यांचे दर्शन घेण्यासाठी मी येथे आलो आहे. मी जर दोषी असतो तर मी इथे का आलो असतो? या सर्व विषयावर मोठे राजकारण सुरु आहे, व्यक्तीगत राजकारणातून या गोष्टी घडत गेल्या, मी आपल्याला आश्वासित करतो की या प्रकरणात योग्यतो न्याय हा होईलच. मी तुम्हाला न्याय मिळवून देईल, काही दिवसांतच हा प्रश्न मार्गी लागेल. आपल्या हवा तसाच हा तिढा सुटेल. असेही ते या वेळी म्हणाले.
हे देखील वाचा – Railway Recruitment 2025 : रेल्वेत सरकारी नोकरीची संधी.. अर्ज भरण्याची शेवटची तारीख कोणती?









