Pune Jain Boarding : पुण्यातील जैन बोर्डिंग ट्रस्टच्या जागेवरून सुरू असलेला वाद अखेरीस संपुष्टात आला. बिल्डर विशाल गोखलेंनी जैन बोर्डिंग ट्रस्टसोबतचा जागेचा व्यवहार अखेर रद्द करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. विशाल गोखले (Vishal Gokhale) यांनी जागेचा व्यवहार रद्द करण्याचा निर्णय ई-मेलद्वारे जैन ट्रस्टला कळवला आहे.
जैन बोर्डिंगच्या जागेच्या विक्रीवरून पुण्यात आणि पर्यायाने राजकीय वर्तुळात मोठे वादळ उठले होते. या प्रकरणी शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि माजी आमदार रविंद्र धंगेकर यांनी भाजप खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर गंभीरस्वरूपाचे आरोप केले होते. मात्र, मुरलीधर मोहोळ यांनी या आरोपांना प्रतिउत्तर देत हे सर्व आरोप फेटाळून लावले होते. दरम्यान, या प्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि रविंद्र धंगेकर यांच्यात देखील चर्चा झाली होती. या प्रकरणी दोन दिवसांत तोडगा काढला जाईल, असे आश्वासन एकनाथ शिंदे यांनी रवींद्र धंगेकर यांना दिले होते.
विशेष म्हणजे, नैतिकतेच्या मुद्द्यावर या व्यवहारातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचे गोखले यांनी सांगितले केले आहे. “जैन धर्मियांच्या भावना दुखवायच्या नव्हत्या,” असेही त्यांनी या ईमेल मध्ये नमूद केले आहे. त्यांनी धर्मादाय आयुक्तालयालाही पत्र पाठवून व्यवहार रद्द झाल्याबद्दल योग्य अशी कार्यवाही करण्यास सांगितले आहे.
काही दिवसांपूर्वी धर्मादाय आयुक्तांकडून या व्यवहाराला स्थगिती देण्यात आली होती. गोखले बिल्डर्सकडून या जमीन व्यवहारासाठी जैन बोर्डिंग हाऊसला २३० कोटी रुपये दिले गेले होते. हे पैसे देखील लवकरात लवकर परत देण्यात यावेत, अशी मागणी विशाल गोखले यांनी ई-मेलमध्ये केली आहे.
याशिवाय दोन दिवसात जैन बोर्डिंगचा व्यवहार पूर्णपणे रद्द झाल्यास, मुरलीधर मोहोळ यांच्यासह सगळ्यांना जिलेबी भरवणार असल्याचे धंगेकरांनी सांगतिले. त्यामुळे पुढील दोन दिवस मुरलीधर मोहोळ यांच्याबद्दल मी काहीही बोलणार नाही, असेही यावेळी रवींद्र धंगेकर म्हणाले. त्यांमुळे गोखले यांनी व्यवहार रद्द केल्यामुळे आता हा वाद मिटणार असल्याची चिन्ह दिसत आहेत.
हे देखील वाचा – Farmer Loss : यंदाच्या दिवाळीत शेतकऱ्यांना बसला अवकाळीचा तडाखा..









