Pune Congress News : पुणे विधान परिषद निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर, पुणे काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद आणि असंतोष आता उघडपणे समोर आला आहे. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस पक्षाची पद्धतशीरपणे गळचेपी होत असल्याचा गंभीर आरोप करत पुण्याचे ज्येष्ठ नेते व माजी नगरसेवक अरविंद शिंदे यांनी थेट दिल्ली दरबारी धाव घेतली आहे. अरविंद शिंदे यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांना थेट ईमेल पाठवून, महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या कार्यपद्धतीवर तीव्र आक्षेप नोंदवणारी अधिकृत तक्रार दाखल केली आहे. वरिष्ठ पातळीवरील या थेट हस्तक्षेपामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात आणि प्रामुख्याने काँग्रेस पक्षात प्रचंड खळबळ उडाली आहे.
या संपूर्ण वादाच्या केंद्रस्थानी विधान परिषद निवडणुकीदरम्यान शरद पवार गटाला देण्यात आलेला पाठिंबा हा मुख्य मुद्दा आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पुणे जिल्ह्यातील स्थानिक नेतृत्व, पदाधिकारी अथवा कार्यकर्त्यांना कोणत्याही प्रकारे विश्वासात न घेता, तसेच स्थानिक पातळीवर कोणतीही चर्चा न करता परस्पर शरद पवार यांच्या पक्षाच्या उमेदवाराला काँग्रेसचा पाठिंबा जाहीर केला, असा स्पष्ट आरोप अरविंद शिंदे यांनी केला आहे. प्रदेशाध्यक्षांच्या या एकतर्फी आणि हुकूशाही निर्णयप्रक्रियेमुळे पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचे खच्चीकरण होत असून, आगामी निवडणुकांमध्ये पक्षाचे मोठे राजकीय नुकसान होऊ शकते, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन प्रदेशाध्यक्षांवर तातडीने शिस्तभंगविषयक कारवाई करण्यात यावी, अशी आग्रही मागणी शिंदे यांनी पक्षश्रेष्ठींकडे केली आहे.
महाविकास आघाडीच्या जागावाटपात आणि धोरणात्मक निर्णयांमध्ये पुणे काँग्रेसला सातत्याने दुय्यम स्थान दिले जात असल्याचा सूर गेल्या काही दिवसांपासून स्थानिक पातळीवर उमटत होता. मित्रपक्षांसोबत तडजोडी करताना काँग्रेस पक्षाच्या अस्तित्वालाच धक्का लागत असल्याची भावना अरविंद शिंदे यांनी आपल्या तक्रारीत अधोरेखित केली आहे. हा अंतर्गत संघर्ष आता अधिक तीव्र झाला असून, आपली भूमिका आणि पुढील दिशा स्पष्ट करण्यासाठी अरविंद शिंदे यांनी आज (बुधवारी) पुण्यात एका विशेष पत्रकार परिषदेचे आयोजन केले आहे. या परिषदेत ते महाविकास आघाडीतील जागावाटपाच्या विसंगतींवर आणि प्रदेश नेतृत्वाच्या भूमिकेवर आणखी कोणते मोठे खुलासे करतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.










