पाटणा मेट्रो सुरु करण्यासाठी पुणे मेट्रो ट्रेनचे डबे मागवले

pune metro


पुणे- पुण्याच्या मेट्रोचे डबे पाटणा मेट्रोसाठी पाठवण्यात आले आहेत. बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाटणा मेट्रोचे उद्घाटन येत्या स्वातंत्र्यदिनी करण्यात येणार आहे. त्यासाठी पुण्याकडून तीन रेल्वे डबे तीन वर्षांसाठी भाड्याने घेण्यात आले आहेत. पुणे मेट्रोत आपत्कालीन स्थितीत वापरण्यासाठी राखीव ठेवण्यात आलेले हे डबे पाटण्याला देण्यात आल्याबद्दल प्रदेश युवक काँग्रेसने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

पाटणा मेट्रोचे येत्या १५ ऑगस्ट रोजी उद्घाटन करण्यात येणार असून त्यासाठीच्या मेट्रो डबे आतापर्यंत आलेले नाहीत. त्यामुळे पुणे मेट्रोकडे असलेले तीन डबे बिहारच्या गीतागड मेट्रो डेपोत पाठवण्यात आले आहेत. युवक काँग्रेसने यावर कडाडून टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, हा एक राजकीय स्टंट आहे. केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पाटणा मेट्रोचे उद्घाटन घाईघाईत करण्यात येत आहे. आधीच पुण्याला आवश्यक असलेल्या सर्व ३४ गाड्या सुरू झाल्या नाहीत. त्यातही तीन मेट्रो डबे आपत्कालीन स्थितीत वापरण्यासाठी ठेवण्यात आले होते ते आता परस्पर बिहारला पाठवण्यात आल्यामुळे पुण्यात काही संकट निर्माण झाल्यास काय करणार?

पाटणा मेट्रो प्रकल्पाची सुरुवातच या पुण्याच्या मेट्रो डब्यांनी करण्यात येणार आहे. युवक काँग्रेसचे सरचिटणीस प्रथमेश अबनावे यांनी म्हटले आहे की, कोणत्याही राजकीय वा सार्वजनिक चर्चेशिवाय हे डबे परस्पर पाटण्याला देण्याचा निर्णय केवळ राजकीय लाभासाठी घेण्यात आला असून महाराष्ट्राला गृहित धरण्याचा हा प्रकार आहे.