PMC Election Results : पुणे महानगरपालिका निवडणुकीत वडगाव शेरी मतदारसंघातील लक्षवेधी लढतीत भारतीय जनता पक्षाने जोरदार मुसंडी मारली आहे. प्रभाग क्रमांक 4 (खराडी-वाघोली) आणि प्रभाग क्रमांक 3 (विमान नगर-लोहेगाव) या दोन्ही प्रभागांमध्ये भाजपच्या उमेदवारांनी सहज विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे, या दोन्ही प्रभागांतून निवडणूक लढवणारे सुरेंद्र पठारे आणि त्यांच्या पत्नी ऐश्वर्या पठारे हे पती-पत्नी मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत.
केवळ हे दोघेच नव्हे, तर या दोन्ही प्रभागांमधील भाजपचे संपूर्ण पॅनेल निवडून आले आहे. प्रभाग क्रमांक 3 मध्ये ‘अ’ जागेवरून प्रीतम खांदवे, ‘ब’ मधून अनिल सातव, ‘क’ मधून ऐश्वर्या पठारे आणि ‘ड’ जागेवरून रामदास दाभाडे यांनी विजय संपादन केला. त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक 4 मध्ये ‘अ’ जागेवरून शैलजा बनसोडे, ‘ब’ मधून रत्नमाला सातव, ‘क’ मधून तृप्ती भरणे आणि ‘ड’ जागेवरून सुरेंद्र पठारे विजयी झाले आहेत.
पठारे पती-पत्नीचा हा विजय राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे, कारण त्यांनी निवडणुकीच्या काही काळ आधीच भाजपमध्ये प्रवेश केला होता. सुरेंद्र पठारे यांचे वडील बापूसाहेब पठारे हे सध्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे आमदार आहेत. निकाल जाहीर झाल्यानंतर पठारे पती-पत्नीने कार्यकर्त्यांच्या आणि मतदारांच्या उपस्थितीत जल्लोष साजरा केला.
पुणे महानगरपालिकेच्या एकूण 163 जागांसाठी हे मतदान पार पडले होते. प्रभाग क्रमांक 35 मधील मंजुषा नागपुरे आणि श्रीकांत जगताप हे भाजपचे दोन उमेदवार आधीच बिनविरोध निवडून आल्याने उर्वरित जागांसाठी ही लढत झाली.
पुण्यातील सर्वात श्रीमंत उमेदवार
सुरेंद्र पठारे हे त्यांच्या अफाट संपत्तीमुळे संपूर्ण निवडणुकीत चर्चेचा विषय ठरले होते. त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, ते पुणे महानगरपालिकेच्या रिंगणातील सर्वात श्रीमंत उमेदवार होते. त्यांच्या कुटुंबाची एकूण मालमत्ता 271 कोटी 85 लाख 21 हजार 877 रुपये इतकी आहे.
पठारे यांच्या संपत्तीचा मोठा हिस्सा हा स्थावर मालमत्तेत असून, त्याचे मूल्य 217 कोटी 93 लाख 4 हजार 887 रुपये आहे. यामध्ये विविध जमिनी, व्यावसायिक इमारती आणि निवासी घरांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, त्यांच्यावर बँकांचे आणि इतर संस्थांचे मिळून 46 कोटी 59 लाख 89 हजार 262 रुपये इतके कर्ज देखील आहे.









