Pune Mayor Election : पुणे महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाने निर्विवाद बहुमत मिळवल्यानंतर आता शहराचा पुढील प्रथम नागरिक (महापौर) कोण असेल, याची प्रतीक्षा संपली आहे. महापौरपदाच्या निवडीसाठी अधिकृत वेळापत्रक जाहीर झाले असून, ९ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी 11 वाजता ही निवड प्रक्रिया पार पडणार आहे.
असे आहे निवडणुकीचे वेळापत्रक
महापौर निवडीसाठी विभागीय आयुक्तांनी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची पीठासीन अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. निवडणुकीचा मुख्य कार्यक्रम खालीलप्रमाणे असेल:
- अर्ज दाखल करणे: ३ फेब्रुवारी २०२६ (सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत).
- मतदान आणि निवड: ९ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी 11 वाजता सभा सुरू होईल.
- अर्ज माघारी: प्रत्यक्ष निवडणुकीच्या दिवशी सभा सुरू झाल्यानंतर उमेदवारांना नाव मागे घेण्यासाठी 15 मिनिटांची मुदत दिली जाईल, त्यानंतर लगेचच मतदान प्रक्रिया पार पडेल.
आरक्षणाचा पेच आणि न्यायालयीन सुनावणी
पुणे महानगरपालिकेचे महापौरपद सध्या ‘महिला खुला प्रवर्ग’ या गटासाठी आरक्षित करण्यात आले आहे. मात्र, ही आरक्षण सोडत नियमानुसार चक्रानुक्रमे झालेली नाही, असा दावा करणारी एक याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.
न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती अभय मंत्री यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर ३० जानेवारी रोजी सुनावणी पार पडणार आहे. न्यायालयाच्या या निकालावर निवडणुकीचे भवितव्य अवलंबून असणार आहे.
भाजपमध्ये नावांची चर्चा
महापालिकेत भाजपची एकहात्ती सत्ता असल्याने महापौरपदासाठी पक्षांतर्गत अनेक महिला नगरसेविकांची नावे चर्चेत आहेत. अनुभवी चेहऱ्याला संधी मिळणार की नवीन नेतृत्वाला वाव दिला जाणार, याबाबत पक्षाच्या कोअर कमिटीमध्ये खलबतं सुरू आहेत. ३ फेब्रुवारीला उमेदवारी अर्ज भरल्यानंतरच खऱ्या अर्थाने चित्र स्पष्ट होईल.











