Navale Bridge Accident : पुणे शहराच्या नवले पुलाजवळ काल (13 नोव्हेंबर) सायंकाळी सुमारे 5 वाजता एक अत्यंत दुर्दैवी आणि भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. साताऱ्याहून पुण्याच्या दिशेने येणाऱ्या एका कंटेनरने अनेक वाहनांना धडक दिल्याने हा अपघात झाला. धडकेनंतर ट्रक आणि कंटेनर दोन्हीला आग लागली, ज्यात 8 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, सुमारे 20 जण जखमी झाले आहेत.
मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये रुपयांची मदत
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेवर तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी एक्सवर (X) पोस्ट करून या अपघातातील मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्याची घोषणा केली. ही घटना अत्यंत वेदनादायी असल्याचे त्यांनी म्हटले असून, जखमींवर तातडीने उपचार सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. पालकमंत्री अजित पवार आणि आमदार रोहित पवार यांनीही या अपघातावर शोक व्यक्त करत मृतांना श्रद्धांजली अर्पण केली.
अपघातात 8 जणांचा बळी
या अपघातामध्ये अग्निशमन दलाने 8 जणांचे मृतदेह बाहेर काढले. मृतांमध्ये एकाच कुटुंबातील 5 व्यक्तींचा समावेश आहे, जे धायरी येथील रहिवासी होते आणि नारायणपूर येथून देवदर्शन करून परत येत होते. एका 3 वर्षांच्या मुलीचाही या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. जखमींना तातडीने ससून रुग्णालयासह अन्य रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
अपघाताचे कारण आणि ‘ब्लॅक स्पॉट’ची चर्चा
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, हा अपघात राजस्थान पासिंगच्या एका लोडेड ट्रकला नवले पुलावरील ‘सेल्फी पॉईंट’जवळ ब्रेक फेल झाल्याने झाला. ब्रेक फेल झालेल्या ट्रकने समोरच्या अनेक वाहनांना जोरदार धडक दिली. या धडकेत दोन अवजड वाहनांच्या मध्ये एक कार अडकल्याने मोठा स्फोट होऊन आग लागली.
नवले पूल हा भाग यापूर्वीच ‘ब्लॅक स्पॉट’ म्हणून ओळखला जातो. आमदार रोहित पवार यांनी यावर प्रशासनाचे लक्ष वेधले असून, तीव्र उतार आणि धोकादायक वळणामुळे वारंवार होणारे अपघात टाळण्यासाठी प्रशासनाने कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी पुणेकरांकडून होत आहे.









