Pune News : राज्यात सत्तेत असलेल्या महायुतीतील घटक पक्षांमध्येच आता जोरदार राजकीय घमासान सुरू झाल्याचे चित्र दिसत आहे. विशेषतः पुणे–पिंपरी चिंचवड परिसरात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यात आरोप–प्रत्यारोपांची धार अधिक तीव्र झाली आहे. भाजप आमदार महेश लांडगे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील शाब्दिक चकमकींमुळे राजकीय वातावरण तापले असून, या संघर्षात कोण वरचढ ठरणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) उमेदवार बाबुराव चांदेरे यांच्या विरोधात भाजपकडून थेट मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल करण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. चांदेरे यांचे नामांकन रद्द करण्याची मागणी करत भाजपचे उमेदवार गणेश कळमकर यांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत.
याचिकेनुसार, बाबुराव चांदेरे यांनी उमेदवारी अर्जासोबत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात प्रलंबित गुन्हेगारी प्रकरणांची माहिती लपवली, असा गंभीर आरोप करण्यात आला आहे. याचिकाकर्त्यांचा दावा आहे की, चांदेरे यांच्याविरोधात दोन गुन्हे प्रलंबित असून, या प्रकरणांमध्ये दोषारोपपत्र दाखल झालेले आहे. काही गुन्ह्यांमध्ये २ ते १० वर्षांपर्यंतच्या कारावासाची तरतूद असल्याचेही याचिकेत नमूद करण्यात आले आहे.
गणेश कळमकर यांनी आपल्या निवेदनात स्पष्ट केले आहे की, शपथेवर माहिती लपवणे किंवा खोटे विधान करणे हा केवळ तांत्रिक दोष नसून गंभीर गुन्हा आहे. भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम २२९ नुसार खोटे पुरावे देणे हा दंडनीय अपराध ठरतो. अशा प्रकारामुळे मतदारांच्या माहितीच्या अधिकारावर गदा येते, असा दावा त्यांनी केला आहे. महायुतीतील अंतर्गत संघर्ष, त्यातच न्यायालयीन लढाई सुरू झाल्याने पुणे–पिंपरी चिंचवडमधील राजकीय समीकरणे अधिकच गुंतागुंतीची होत असल्याचे चित्र आहे.








