Rashtrawadi together पिंपरी-चिंचवड, पुणे आणि परभणी महापालिका येथे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र (Rashtrawadi together )निवडणूक लढवणार हे शेवटी स्पष्ट झाले आहे. अजित पवार आणि रोहित पवार यांनी ही घोषणा केली. दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आपल्या घड्याळ आणि तुतारी या स्वतंत्र चिन्हांवर निवडणूक लढवतील याबाबतही एकमत झाले. अजित पवार हे राष्ट्रवादी पक्ष फोडून बाहेर पडल्यानंतर निर्माण झालेली कटुता प्रथमच थोडी निवळल्याचे हे चित्र आहे.
काल मध्यरात्री उशिरा अजित पवार यांनी दोन्ही पक्षांच्या एकत्र येण्याबाबत सूचक वक्तव्य केले होते व त्यानंतर आज सकाळी शरद पवार राष्ट्रवादीचे नेते आ.रोहित पवार यांनी वार्ताहरांशी बोलताना सांगितले की, पुणे शहरात सुप्रिया सुळे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. पिंपरी-चिंचवडमध्ये शशिकांत शिंदे यांनी पक्ष कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या. तेव्हा सर्वच कार्यकर्त्यांचे असे म्हणणे होते की, दोन्ही पक्षांनी या निवडणुका एकत्र लढल्या पाहिजेत. ही निवडणूक कार्यकर्त्यांची आहे. त्यामुळे त्यांचे मत विचारात घेऊन आम्ही हा निर्णय घेत आहोत.
प्रशांत जगताप यांच्याविषयी बोलताना ते म्हणाले की, ते एक चांगले कार्यकर्ते होते. त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय का घेतला त्याची वेगळी मोठी कारणे आहेत ते मी सांगणार नाही. पण त्यांनी ज्या कार्यकर्त्यांची पक्ष प्रवेशाच्यावेळी नावे घेतली त्या सर्व कार्यकर्त्यांनी सुप्रिया सुळे यांना आपण घड्याळासोबत गेले पाहिजे असे सांगितले.
दरम्यान, त्याआधी अजित पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीला दोन्ही राष्ट्रवादीचे नेते उपस्थित होते. रात्री उशिरापर्यंत खलबते करण्यात आली. त्यानुसार, पुणे महानगरपालिकेत अजित पवार गट 125 तर शरद पवार गट 40 जागांवर लढेल, असे ठरवण्यात आले. मात्र अन्य ठिकाणच्या जागांचा तपशील देण्यात आला नाही. दुसरीकडे पिंपरी-चिंचवडमधील सर्व प्रश्न एकत्रितपणे सोडवण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र आल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारीच तळवडे येथे केली होती. याच ठिकाणाहून त्यांनी महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडत आगामी निवडणुकीत शहरात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार असल्याचे स्पष्ट केले.
या निर्णयामुळे महायुती आणि महाविकास आघाडीच्या समीकरणांवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये अजून
जागावाटपाचा आकडा गुलदस्त्यात आहे. परभणीमध्येही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढत असून तिथेही जागावाटपाबाबत उशिरापर्यंत काहीही सांगण्यात आलेले नाही.
हे देखील वाचा –
डिझेल-पेट्रोलचे टेन्शन सोडा! 7 लाखांच्या बजेटमध्ये घरी न्या इलेक्ट्रिक कार; पाहा टॉप 3 स्वस्त पर्याय
उन्नाव बलात्कार प्रकरणातील कुलदीप सिंह सेंगरचा जामिनाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती








