Home / महाराष्ट्र / Pune Unseasonal Rain : राज्यात अवकाळीचा तडाखा; पुणे, पिंपरी-चिंचवडसह विदर्भात पावसाची जोरदार हजेरी, बळीराजा पुन्हा चिंतेत

Pune Unseasonal Rain : राज्यात अवकाळीचा तडाखा; पुणे, पिंपरी-चिंचवडसह विदर्भात पावसाची जोरदार हजेरी, बळीराजा पुन्हा चिंतेत

Pune Unseasonal Rain : भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तवलेल्या अंदाजानुसार, राज्याच्या विविध भागांत अवकाळी पावसाने जोरदार पुनरागमन केले आहे. सोमवारी...

By: Team Navakal
Pune Unseasonal Rain
Social + WhatsApp CTA

Pune Unseasonal Rain : भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तवलेल्या अंदाजानुसार, राज्याच्या विविध भागांत अवकाळी पावसाने जोरदार पुनरागमन केले आहे. सोमवारी दुपारी पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि विदर्भातील वाशिम जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले. अचानक आलेल्या या पावसामुळे वाढत्या उन्हापासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला असला, तरी शेती पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाल्याने शेतकरी वर्ग मोठ्या संकटात सापडला आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये पावसाची ‘बॅटिंग’-
पुणे शहरात सकाळपासूनच सूर्य आणि ढगांचा लपंडाव सुरू होता. मात्र, दुपारच्या सुमारास बाणेर, शिवाजीनगर, हडपसर, पुणे स्टेशन आणि लोणी काळभोर या परिसरांत पावसाने रौद्र रूप धारण केले. बाणेर सारख्या सखल भागांत पावसाच्या जोरामुळे रस्त्यांवर पाणी साचले होते, ज्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावला. पिंपरी-चिंचवड औद्योगिक नगरीतही सुमारे अर्धा तास पावसाने दमदार हजेरी लावली. अचानक आलेल्या या सरींमुळे कामानिमित्त बाहेर पडलेल्या चाकरमान्यांची आणि पादचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. या पावसानंतर वातावरणात गारवा निर्माण झाला असून उन्हाच्या झळांपासून पुणेकरांना तात्पुरती सुटका मिळाली आहे.

वाशिममध्ये पिकांवर संकट; बळीराजा हवालदिल-
विदर्भातील वाशिम जिल्ह्यात, विशेषतः रिसोड तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतीचे गणित कोलमडले आहे. काढणीला आलेल्या पिकांना या पावसाचा मोठा फटका बसण्याची भीती आहे. प्रामुख्याने बीजवाई कांदा, आंबा आणि विविध फळबागांसह भाजीपाला पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. हातातोंडाशी आलेला घास या अस्मानी संकटामुळे हिरावला जाण्याच्या भीतीने शेतकरी चिंताक्रांत झाला आहे. अवेळी आलेल्या या पावसाने शेतातील मशागतीच्या कामातही अडथळे निर्माण केले आहेत.

हवामान विभागाचा पुढील इशारा आणि गारपिटीची शक्यता-
हवामान खात्याने ३० मार्च ते ४ एप्रिल या कालावधीत राज्यातील हवामानात मोठ्या बदलांचे संकेत दिले आहेत. खानदेश, मराठवाडा, पश्चिम विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील घाट माथ्यावर दुपारनंतर मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या काळात ताशी ३० ते ५० किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची आणि काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. विशेषतः १ एप्रिलपासून पावसाची तीव्रता अधिक वाढण्याचा अंदाज आहे.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या