साताऱ्यात वारकर्‍यांच्या सुविधांसाठी ‘क्यू आर कोड’

कराड- जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा सातारा जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. यावेळी वारकऱ्यांसाठी जिल्ह्यात असलेल्या सुविधांची माहिती वारकर्‍यांना व्हावी, यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्या संकल्पनेतून वारकर्‍यांसाठी QR code उपलब्ध केला आहे. याद्वारे प्रत्येक गावातील शौचालय, आरोग्य सेवा, पाणी, महिला स्नानगृहे, मुक्काम, निवास,पेट्रोल पंप व संपर्क माहिती मिळणार आहे. प्रत्येक सुविधेवर क्लिक करताच त्याचे Google location map दिसणार आहे.


जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रज्ञा माने यांनी सांगितले की, या सोहळ्यात स्वच्छता ठेवण्याबरोबर स्वच्छतेच्या सुविधा उपलब्ध करुन देण्याला महत्त्व असते. त्यानुसार १४६ पुरुष स्नानगृहे, १६७ महिला स्नानगृहे, महिला व पुरुषांसाठी ७२ तात्पुरत्या मुताऱ्या असणार आहेत. यंदा जिल्ह्यातील लोणंद नगरपंचायत हद्दीत १३ ठिकाणी १८०० शौचालये, तरडगाव येथे १८ ठिकाणी १८०० शौचालये, फलटण येथे १६ ठिकाणी १८०० शौचालये, चरड येथे १९ ठिकाणी १८०० शौचालये उभारण्यात येणार आहेत. पालखी मार्गावर सार्वजनिक शौचालय, सुलभ सार्वजनिक शौचालय, मंगल कार्यालय शौचालय, Hotel toilet, वैयक्तिक शौचालय, आश्रमशाळा अशा १० हजार १०७ शौचालयाची व्यवस्था असणार आहे. पाडेगाव, तरडगाव येथे कायमस्वरूपी सुलभ शौचालय उभारण्यात आले आहे.