Home / महाराष्ट्र / Rahul Narvekar BMC Election 2026 : धमकी, आमिष आणि कोटींच्या आरोपांनी कुलाबा प्रभाग हादरला; तेजल पवार विरुद्ध राहुल नार्वेकर संघर्ष तीव्र; मुंबईतील वॉर्ड क्रमांक २२६ मध्ये नेमक घडतंय तरी काय?

Rahul Narvekar BMC Election 2026 : धमकी, आमिष आणि कोटींच्या आरोपांनी कुलाबा प्रभाग हादरला; तेजल पवार विरुद्ध राहुल नार्वेकर संघर्ष तीव्र; मुंबईतील वॉर्ड क्रमांक २२६ मध्ये नेमक घडतंय तरी काय?

Rahul Narvekar BMC Election 2026 : मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कुलाबा परिसरातील प्रभाग क्रमांक २२६ सध्या राजकीय वर्तुळात विशेष...

By: Team Navakal
Rahul Narvekar BMC Election 2026
Social + WhatsApp CTA

Rahul Narvekar BMC Election 2026 : मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कुलाबा परिसरातील प्रभाग क्रमांक २२६ सध्या राजकीय वर्तुळात विशेष चर्चेचा विषय ठरला आहे. या प्रभागातून निवडणूक लढवत असलेल्या उमेदवार तेजल पवार यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आपल्यावर उमेदवारी मागे घेण्यासाठी दबाव टाकल्याचा आणि धमकावल्याचा गंभीर आरोप केला होता. विशेष म्हणजे याच प्रभागातून राहुल नार्वेकर यांचे बंधू मकरंद नार्वेकर हे देखील निवडणुकीच्या रिंगणात असल्याने या आरोपांना अधिकच राजकीय महत्त्व प्राप्त झाले.

तेजल पवार यांनी केलेल्या आरोपांनंतर या प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले. राहुल नार्वेकर यांनी हे सर्व आरोप स्पष्ट शब्दांत फेटाळून लावत उलट तेजल पवार यांनीच उमेदवारी मागे घेण्यासाठी पाच कोटी रुपयांची मागणी केल्याचा दावा केला. या परस्परविरोधी आरोपांमुळे प्रभाग क्रमांक २२६ मधील राजकीय वातावरण तापले असून या प्रकरणाची चर्चा मुंबईच्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

या साऱ्या घडामोडींनंतर आता या प्रभागात राजकीय समीकरणे वेगाने बदलताना दिसत आहेत. विविध पक्षांनी आणि अपक्ष उमेदवारांनी राहुल नार्वेकर यांचे बंधू मकरंद नार्वेकर यांच्या विरोधात एकत्र येण्याची भूमिका घेतल्याचे चित्र समोर आले आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांमध्ये पडद्यामागील हालचालींना वेग आला असून, हा प्रभाग अत्यंत चुरशीचा ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

तेजल पवार यांनी काल शिवसेना भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले होते. या पत्रकार परिषदेनंतर राजकीय घडामोडींना वेग आला आणि मनसे, शिवसेना (ठाकरे गट), काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) तसेच वंचित बहुजन आघाडी या सर्व पक्षांनी एकत्र येत तेजल पवार यांना उघडपणे पाठिंबा जाहीर केला. विशेष म्हणजे मनसेने तेजल पवार यांना अधिकृतपणे पुरस्कृत केले असून शिवसेना ठाकरे गटाने त्यांना सक्रिय पाठिंबा दिला आहे.

या सर्वपक्षीय पाठिंब्यामुळे तेजल पवार सध्या प्रभाग क्रमांक २२६ मध्ये जोमाने प्रचार करत आहेत. त्यांच्या प्रचाराला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत असून मतदारांमध्ये उत्सुकता दिसून येत आहे. विशेष लक्ष वेधून घेणारा त्यांचा प्रचार रथ सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. या रथावर राज ठाकरे, उद्धव ठाकरे, राहुल गांधी, शरद पवार, सोनिया गांधी, आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांचे फोटो झळकत असून, या माध्यमातून व्यापक राजकीय एकजूट दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

मुंबईतील कुलाबा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक २२६ संदर्भात सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या मालिकेमुळे राजकीय वातावरण अधिकच तापले आहे. उमेदवारी मागे घेण्यासाठी आमच्याकडून पाच-पाच कोटी रुपयांची मागणी करण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला, असा गंभीर दावा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अलीकडेच केला होता. त्यांच्या या वक्तव्याला आता सामाजिक कार्यकर्ते तथा राजकीय नेते हरिभाऊ राठोड यांनी तीव्र शब्दांत प्रत्युत्तर दिले असून, या संपूर्ण प्रकरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

या वादाची सुरुवात तेव्हा झाली, जेव्हा कुलाबा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक २२६ मधील अपक्ष उमेदवार तेजल पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन आमदार राहुल नार्वेकर यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यांनी सांगितले की, उमेदवारी मागे घेण्यासाठी त्यांना दहा लाख रुपयांचे आमिष दाखवण्यात आले होते. तसेच, नामांकन अर्ज मागे न घेतल्यास तडीपार करण्याची धमकी दिल्याचा दावाही त्यांनी केला. या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती.

या आरोपांनंतर राहुल नार्वेकर यांनी स्वतंत्र पत्रकार परिषद घेत तेजल पवार यांचे सर्व आरोप फेटाळून लावले. त्यांनी उपरोधिक स्वरात, “तेजल पवार यांना चार-पाच दिवसांनंतर जाग आली काय? मी कोण, तेजल पवार कोण, मला त्या ओळखीच्या देखील नाहीत,” असे विधान केले. याच पत्रकार परिषदेत त्यांनी पलटवार करत असा आरोप केला की, उमेदवार तेजल पवार यांचे पती दीपक पवार यांनी उमेदवारी मागे घेण्यासाठी पाच कोटी रुपयांची मागणी केली होती.

मात्र, राहुल नार्वेकर यांच्या या आरोपांवर हरिभाऊ राठोड यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अपक्ष उमेदवारावर एवढा गंभीर आरोप करण्यासाठी आमदार नार्वेकर यांना तब्बल पाच दिवस का लागले, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. जर खरोखरच असा प्रकार घडला असेल, तर तो तात्काळ समोर का आणण्यात आला नाही, असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी या कथनाच्या विश्वासार्हतेवर संशय व्यक्त केला.

या संदर्भात बोलताना हरिभाऊ राठोड यांनी असेही नमूद केले की, या विलंबित आरोपांवरून असे स्पष्ट होते की, आमदार राहुल नार्वेकर सध्या ‘फेक नरेटिव्ह’ तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत. खरे मुद्दे बाजूला ठेवून दिशाभूल करणारी कथा उभी केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २२६ मधील राजकीय संघर्ष अधिक तीव्र होत असून, येत्या काळात या प्रकरणाचे पडसाद निवडणूक प्रचारात अधिक ठळकपणे उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हे देखील वाचा – MG Windsor EV : टाटा मोटर्सला मोठा धक्का! ‘ही’ ठरली 2025 मधील सर्वाधिक विकली जाणारी इलेक्ट्रिक कार; पाहा खासियत

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या