Raigad Crime : संसाराची स्वप्ने पाहणाऱ्या एका तरुणीचा अवघ्या सहा महिन्यांतच तिच्या पतीने क्रूर अंत केल्याची धक्कादायक घटना रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यात उघडकीस आली आहे. चारित्र्याचा संशय आणि पैशांच्या हव्यासापोटी सतीश चव्हाण याने आपली पत्नी निकिता राठोड (वय २२ वर्षे) हिची हत्या करून तिचा मृतदेह जंगलात फेकून दिला होता. या प्रकरणी म्हसळा पोलिसांनी तातडीने तपास चक्रे फिरवून आरोपी पतीला अटक केली आहे.
विवाह आणि वादाची पार्श्वभूमी-
पोलीस तपासातून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी सतीश चव्हाण याचा विवाह सहा महिन्यांपूर्वी त्याच्या सख्ख्या मामाची मुलगी निकिता हिच्याशी झाला होता. हे जोडपे मूळचे कर्नाटकातील गुलबर्गा (कलुबर्गी) येथील रहिवासी असून रोजगाराच्या शोधात ते रायगडमध्ये आले होते. म्हसळा तालुक्यातील एका चिरेखाणीवर ते मजुरीचे काम करत होते. लग्नानंतर सुरुवातीचे काही दिवस सुखात गेल्यानंतर, सतीशने निकिताच्या चारित्र्यावर संशय घेण्यास सुरुवात केली. यावरून त्यांच्यात वारंवार खटके उडत असत.
छळ आणि हत्येचा थरार-
केवळ संशयच नव्हे, तर सतीश निकिताकडे माहेरून पैसे आणण्यासाठी सतत तगादा लावत होता. पैशांच्या मागणीवरून तो तिला शारीरिक आणि मानसिक त्रास देत असल्याचे निकिताच्या नातेवाईकांनी सांगितले. घटनेच्या दिवशी संशयाचे भूत डोक्यात संचारलेल्या सतीशचे निकिताशी तीव्र भांडण झाले. संतापाच्या भरात त्याने निकितावर जीवघेणा हल्ला केला, ज्यात तिचा मृत्यू झाला. गुन्ह्याचा पुरावा नष्ट करण्यासाठी त्याने भररात्री निकिताचा मृतदेह जवळच असलेल्या घनदाट जंगल परिसरात नेऊन टाकला.
असा उघड झाला गुन्हा-
निकिता अचानक बेपत्ता झाल्याने संशय बळावला आणि पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी शोधमोहीम राबवत असताना सतीशची चौकशी केली. मात्र, प्रत्येक वेळी सतीश विसंगत उत्तरे देऊन पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत होता. त्याच्या संशयास्पद हालचालींमुळे पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्या निशानदेहीवरून पोलिसांनी जंगल परिसरातून निकिताचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह हस्तगत केला.
कायदेशीर कारवाई-
म्हसळा पोलिसांनी आरोपी सतीश चव्हाण विरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. अवघ्या सहा महिन्यांपूर्वी विवाहबंधनात अडकलेल्या या दांपत्याचा असा रक्तरंजित अंत झाल्याने परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणाचा अधिक तपास म्हसळा पोलीस करत आहेत.











