Railway Local Mega Block : दिवाळीत तुम्ही कुठे बाहेर जायचा विचार करत आहात का? तर थांबा रेल्वेचं वेळापत्रक एकदा तपासा. उद्या मध्य रेल्वेवर विद्याविहार–ठाणे दरम्यान पाचवा आणि सहावा मार्ग, तसेच हार्बर मार्गावर सीएसएमटी ते चुनाभट्टी आणि वांद्रे दरम्यान मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मुख्य मार्गावरील ब्लॉक सकाळी ८ ते दुपारी १:३० वाजेपर्यंत असेल.
या दरम्यान अप आणि डाउन मार्गावरील मेल-एक्सप्रेस गाड्या देखील जलद मार्गावरून वळविण्यात येणार आहेत. त्यामुळे मेल-एक्सप्रेस गाड्या सुमारे १०-१५ मिनिटे उशीरा पोहोचण्याची शक्यता आहे. हार्बर मार्गावर सीएसएमटी ते चुनाभट्टी, वांद्रे दरम्यान सकाळी १०:१० ते दुपारी ४:४० वाजेपर्यंत हा ब्लॉक राहणार आहे. या काळात सीएसएमटी ते चुनाभट्टी, वांद्रे आणि गोरेगाव या दरम्यानची लोकल सेवा रद्द करण्यात येणार आहे.
प्रवाशांच्या सोयीसाठी कुर्ला – पनवेल दरम्यान स्पेशल लोकल सेवा देखील चालविली जाईल. कांजूरमार्ग स्थानकावर मध्यरात्री ‘पॉवर ब्लॉक’ हा घेण्यात येणार आहे. कल्याण दिशेकडील जुन्या पादचारी पुलाचे ट्रस गर्डर्स काढणे आणि उतरविण्यासाठी शनिवारी रात्री १२ ते रविवारी पहाटे ५ वाजेपर्यंत अप, डाउन, धीम्या, जलद तसेच ०५ आणि ०६ व्या मार्गांवर ब्लॉक घेणार येणार आहे. या काळात धीम्या गाड्या जलद मार्गावर वळवण्यात येणार आहे. शिवाय नाहूर, कांजूरमार्ग आणि विद्याविहार स्थानकांवर थांबणार नाहीत.

दिवाळीसारख्या सणांमध्ये प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणावर असते, त्यामुळे रविवार मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर गैरसोय होऊ शकते. मध्य रेल्वेने प्रवाशांना आवाहन केले आहे की, वेळापत्रक पाहून मगच प्रवासासाठी घराबाहेर पडावे. पश्चिम रेल्वेने दिवाळी सणाच्या कारणास्तव मेगाब्लॉक रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे रविवारी पश्चिम रेल्वेवर कोणताही ब्लॉक नसणार आहे.
हे देखील वाचा –T20 World Cup 2026 : २०२६ टी-२० वर्ल्ड कपसाठी शेवटचा पात्र ठरलेला संघ कोणता?