मुंबई- मागील काही दिवस विश्रांती घेतलेला पाऊस (Rain) राज्यात पुन्हा सक्रिय झाला आहे. राज्यातील अनेक भागांत पावसाने जोरदार हजेरी लावली. त्याचप्रमाणे आता पुढील चार ते पाच दिवस राज्यात मेघगर्जनेसह पाऊस कोसळण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. या कालावधीत कोकण (Konkan), मध्य महाराष्ट्र(Central Maharashtra) आणि मराठवाड्यात (Marathwada)पावसाचा जोर अधिक असेल.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मोसमी वाऱ्यांचा कमी दाबाचा पट्टा अमृतसरपासून(Amritsar) मुज्जफराबाद (Muzaffarabad),पटियाला (Patiala),अरुणाचल प्रदेश (Arunachal Pradesh) आणि हिमालयाच्या (Himalaya) पायथ्यापर्यंत विस्तारला आहे. तसेच तामिळनाडूच्या(Tamil Nadu) किनाऱ्यालगत समुद्रसपाटीपासून चक्राकार वारे वाहत आहेत. तिथून पूर्व मध्य अरबी समुद्रापर्यंत हवेचा पूर्व पश्चिम कमी दाबाचा पट्टा कायम आहे. त्याचाच परिणाम म्हणून सध्या राज्यात पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे पुढील चार ते पाच दिवस राज्यात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. या कालावधीत काही ठिकाणी जोरदार वाऱ्यासह पाऊस पडेल. काही भागात विजांसह पावसाची शक्यता आहे. दरम्यान, मोसमी वाऱ्यांचे प्रवाह मंदावल्याने गेले काही दिवस राज्यात पावसाने उघडीप दिली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा राज्यात पाऊस सक्रिय झाला आहे.