Home / महाराष्ट्र / Raj Thackeray and Mohan Bhagwat : भाषिक भेदभाव हा ‘स्थानिक आजार’ म्हणणाऱ्या भागवतांवर राज ठाकरेंचा प्रहार; ‘सत्ताधारी कचखाऊ म्हणूनच तुमची हिंमत वाढली’

Raj Thackeray and Mohan Bhagwat : भाषिक भेदभाव हा ‘स्थानिक आजार’ म्हणणाऱ्या भागवतांवर राज ठाकरेंचा प्रहार; ‘सत्ताधारी कचखाऊ म्हणूनच तुमची हिंमत वाढली’

Raj Thackeray and Mohan Bhagwat : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मराठी विरुद्ध अमराठी वादावरून केलेल्या एका विधानाने...

By: Team Navakal
Raj Thackeray and Mohan Bhagwat
Social + WhatsApp CTA

Raj Thackeray and Mohan Bhagwat : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मराठी विरुद्ध अमराठी वादावरून केलेल्या एका विधानाने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटले आहेत. भाषिक आधारावर भेदभाव करणे हा एक ‘स्थानिक आजार’ असल्याची टिप्पणी भागवत यांनी केली होती. त्यांच्या या विधानाचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कडक शब्दांत समाचार घेतला असून, सरसंघचालकांना थेट सवाल विचारले आहेत. कार्यक्रमाला उपस्थित असलेली सेलिब्रिटी मंडळी तुमच्या प्रेमापोटी आली नव्हती, तर ती केंद्र सरकार आणि नरेंद्र मोदी यांच्या भीतीपोटी आली होती, अशा शब्दांत राज ठाकरे यांनी भगवंतांवर परखड टीका केली.

“रटाळ प्रवचनांना गर्दी कशी?” राज ठाकरेंचा बोचरा सवाल-
कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सेलिब्रिटी आणि नामवंत व्यक्तींच्या उपस्थितीवरून राज ठाकरे यांनी मोहन भागवतांचा भ्रमनिरास करण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले की, “आजवर अशा रटाळ प्रवचनांना कोणीही फिरकले नाही, मग आजच ही गर्दी कशी झाली? हे लोक आपल्या विचारांमुळे आले आहेत, या गैरसमजातून आपण बाहेर आले पाहिजे. ही केवळ सत्तेची आणि यंत्रणांची भीती आहे, ज्यामुळे ही मंडळी तिथे उपस्थित राहिली.” संघाच्या कामाबद्दल आम्हाला आदर आहे, परंतु याचा अर्थ असा नाही की संघाने आपल्या कक्षेबाहेर जाऊन अप्रत्यक्षपणे राजकीय भूमिका घेण्याच्या भानगडीत पडावे, असा सल्लाही त्यांनी दिला.

हिंदी लादणाऱ्या सरकारचे ‘कान उपटा’-
भाषिक समरसतेच्या गोष्टी शिकवणाऱ्या सरसंघचालकांना राज ठाकरे यांनी कठोर शब्दांत सुनावले. “हिंदी ही या देशाची राष्ट्रभाषा नाही, तरीही केंद्र सरकार ती जबरदस्तीने जनतेवर लादत आहे. जर तुम्हाला खरोखरच भाषिक द्वेष संपवायचा असेल, तर आधी हिंदी लादणाऱ्या सरकारचे कान उपटून दाखवा आणि मगच आम्हाला समरसतेचे डोस पाजा,” अशी टीका देखील त्यांनी केली. केंद्राच्या भाषिक धोरणांवर मौन बाळगून केवळ प्रादेशिक अस्मितेवर भाष्य करणे, हे दुटप्पीपणाचे लक्षण असल्याचे त्यांनी अगदी कठोर शब्दात सांगितले.

“सत्ताधाऱ्यांचे कणे लवचिक असल्यानेच असे धाडस”-
राज ठाकरे यांनी मोहन भागवत यांच्या विधानावर संताप व्यक्त करताना म्हटले की, मराठी माणूस केवळ सहनशील आहे म्हणून असे बोलले जात नाही, तर राज्यातील सध्याचे सत्ताधारी अत्यंत कमकुवत आणि ‘लिबलिबित’ कण्याचे आहेत. महाराष्ट्राच्या हिताचे रक्षण करण्याऐवजी सत्तेसाठी लाचारी पत्करणाऱ्या नेत्यांमुळेच सरसंघचालकांना मराठी अस्मितेबद्दल असे भाष्य करण्याचे धाडस होत आहे, अशी बोचरी टीका त्यांनी केली. महाराष्ट्रातील स्वाभिमान हरवलेल्या राजकारण्यांमुळेच बाहेरील व्यक्तींना मराठी भाषेबद्दल आणि प्रांतीय वादाबद्दल अनुद्गार काढण्याची संधी मिळते, असेही ते म्हणाले.

संघाच्या ‘अराजकीय’ भूमिकेवर प्रश्नचिन्ह-
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्वतःला नेहमीच एक सांस्कृतिक आणि अराजकीय संघटना असल्याचे सांगत असतो. याच मुद्द्यावरून राज ठाकरे यांनी भागवतांना घेरले आहे. “जर संघ ही अराजकीय संघटना आहे, तर त्यांना अशा राजकीय आणि भाषिक वादाच्या भानगडीत पडण्याची गरज काय?” असा रोकडा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला. समाजाला दिशा देण्याचे काम सोडून अशा संवेदनशील विषयांवर भाष्य करून विनाकारण तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न का केला जात आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

जुन्या संदर्भांनी भाजपवर निशाणा-
यावेळी राज ठाकरे यांनी संघाचे माजी सरकार्यवाह भय्याजी जोशी यांच्या विधानाचाही संदर्भ दिला. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही महिन्यांपूर्वी भय्याजी जोशी यांनी ‘मुंबईची भाषा केवळ मराठी नसून ती गुजरातीदेखील आहे’ असे विधान केले होते. या विधानाचा समाचार घेताना राज ठाकरे म्हणाले की, अशा प्रकारची विधाने करून मराठी माणसाला डिवचण्याचे आणि गुजराती भाषिकांना खुश करण्याचे काम सातत्याने केले जात आहे. हे सर्व प्रयत्न अप्रत्यक्षपणे भारतीय जनता पक्षाला निवडणुकीत फायदा मिळवून देण्यासाठीच आखले जातात, असा गंभीर आरोपही त्यांनी केला.

भाषिक अस्मिता आणि राजकीय संघर्ष-
मोहन भागवत यांनी भाषिक वादाला ‘आजार’ संबोधल्याने मराठी प्रेमींमध्ये संतापाची लाट आहे. राज ठाकरे यांनी या विधानाचा अत्यंत आक्रमकपणे प्रतिवाद करून हा वाद अधिकच पेटवला आहे. महाराष्ट्राच्या मातीत भाषिक अस्मिता हा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असताना, संघाच्या सर्वोच्च नेत्यांनी त्यावर केलेल्या भाष्य आता आगामी राजकारणाची दिशा ठरवणारे ठरू शकते.

भाषिक भेदभाव हा ‘स्थानिक आजार’; सरसंघचालक मोहन भागवत यांनी मांडली स्पष्ट भूमिका-
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला शंभर वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, नुकतीच मुंबईत “१०० वर्षांचा संघाचा प्रवास – नवीन क्षितिज” ही दोन दिवसीय विशेष व्याख्यानमाला संपन्न झाली. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. या व्यासपीठावरून बोलताना सरसंघचालक मोहन भागवत यांनी महाराष्ट्रातील ‘मराठी विरुद्ध अमराठी’ या संवेदनशील वादावर आपले विचार मांडले.

समाजात नैसर्गिक भेदभाव नाही-
मोहन भागवत आपल्या भाषणात म्हणाले की, समाजात भाषेच्या आधारावर कोणताही नैसर्गिक भेदभाव अस्तित्वात नाही. जेव्हा काही विशिष्ट घटकांकडून जाणीवपूर्वक भाषिक वादाची मांडणी केली जाते, तेव्हाच त्याचे पडसाद उमटताना दिसतात. मात्र, याचा अर्थ असा मुळीच नाही की सर्व मराठी भाषिक आणि अन्य भाषिक परस्परांविरुद्ध शस्त्रे उपसून उभे ठाकले आहेत. समाजात आजही सलोखा असून, भाषिक वाद चर्चेत असतानाही लोकांचे आपापसातील व्यवहार सुरळीत सुरू होते आणि मैत्रीचे संबंधही कायम होते, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

‘स्थानिक आजार’ आणि सार्वजनिक चर्चा-
भाषिक वादाला ‘स्थानिक आजार’ असे संबोधून सरसंघचालक पुढे म्हणाले की, अशा स्वरूपाच्या वादांना विनाकारण सार्वजनिक स्वरूप देऊ नये. जर आपण या विषयाला अधिक प्रसिद्धी दिली नाही किंवा त्याला मोठे केले नाही, तर हा आजार अधिक फैलावणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. हा वाद एका विशिष्ट भौगोलिक मर्यादेत असला तरी, त्याची लागण इतरत्र होऊ नये, हीच खरी चिंतेची बाब असल्याचे त्यांनी नमूद केले.

सामाजिक ऐक्यावर दिला भर-
संघाच्या शंभर वर्षांच्या प्रवासाचा आढावा घेताना त्यांनी स्पष्ट केले की, भाषेच्या नावावर होणारे राजकारण हे तात्पुरते असते. परंतु, राष्ट्र म्हणून आपण एकत्र राहणे आवश्यक आहे. भाषिक अस्मिता असली तरी ती दुसऱ्या भाषेचा द्वेष करण्यापर्यंत जाऊ नये, असे सुतोवाच त्यांनी आपल्या भाषणातून केले. या व्याख्यानमालेतील त्यांच्या विधानांमुळे आता राजकीय आणि सामाजिक स्तरावर नव्या चर्चेला उधाण आले आहे.

“गोहत्येच्या नावाखालील तमाशावर भागवत कधी बोलणार?” राज ठाकरे यांचा सरसंघचालकांना रोखठोक सवाल-
भाषिक अस्मितेच्या मुद्द्यावरून सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावर प्रहार केल्यानंतर, राज ठाकरे यांनी आता हिंदुत्वाच्या नावाखाली सुरू असलेल्या ‘राजकारणा’वरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला धारेवर धरले आहे. देशात गोहत्येचे राजकारण करून लोकांची माथी भडकवली जात असताना सरसंघचालक मौन का बाळगून आहेत, असा थेट प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केला.

भाषिक प्रेम हा ‘आजार’ नाही, तर इतिहास आहे-
सरसंघचालकांनी भाषिक वादाला ‘स्थानिक आजार’ म्हटल्याचा समाचार घेताना राज ठाकरे म्हणाले की, देशात भाषावार प्रांतरचना का करावी लागली, याचा इतिहास भागवतांना निश्चितच ठाऊक असेल. “आपल्या भाषेवर आणि प्रांतावर प्रेम करणे हा जर भागवतांना आजार वाटत असेल, तर हा आजार या देशातील बहुसंख्य राज्यांमध्ये पसरलेला आहे,” असे त्यांनी सुनावले. भाषिक अस्मिता हा भारतीय लोकशाहीचा आणि रचनेचा अविभाज्य भाग असल्याचे ते म्हणाले.

बीफ एक्सपोर्ट आणि गोहत्येचे राजकारण-
राज ठाकरे यांनी आकडेवारीचा संदर्भ देत केंद्र सरकारवरही निशाणा साधला. २०१४ मध्ये भारत ‘बीफ’ (गोमांस) निर्यातीत जगात नवव्या क्रमांकावर होता, तो आज दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. एका बाजूला गोमांसाची मोठ्या प्रमाणावर निर्यात करायची आणि दुसऱ्या बाजूला देशात गोहत्येच्या नावाखाली राजकारण करून जनतेमध्ये तेढ निर्माण करायची, हा ढोंगीपणा असल्याचे त्यांनी म्हटले. “या निर्यातीतून नफा कमावणाऱ्या व्यापाऱ्यांविरोधात तुम्ही सरकारला खडे बोल कधी सुनावणार?” असा सवाल त्यांनी भागवतांना विचारला.

हिंदुत्वाच्या नावाखालील गैरप्रकारांवर टीका-
हिंदुत्वाचा अर्थ बिभत्सपणा असा होत नाही, असे सांगत राज ठाकरेंनी उत्तर भारतातील कावड यात्रांमधील काही प्रसंगांवर बोट ठेवले. कावड यात्रांमध्ये महिलांना बिभत्स पद्धतीने नाचवले जात असल्याच्या घटनांचा उल्लेख करत त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. हिंदुत्वाच्या नावाखाली देशभरात जो धिंगाणा सुरू आहे, त्यावर भाष्य करण्याचे धाडस संघ प्रमुख दाखवतील का, अशी विचारणा त्यांनी केली.

मनसेची ‘जे चूक ते चूकच’ ही भूमिका-
आपल्या पक्षाच्या कार्याची आठवण करून देताना राज ठाकरे म्हणाले की, रझा अकादमीच्या दंगलीविरोधात मोर्चा असो किंवा मशिदींवरील बेकायदेशीर भोंग्यांविरोधातील आंदोलन, मनसेने नेहमीच आक्रमक भूमिका घेतली. “हिंदू सणांच्या वेळी मोठ्या आवाजात लाऊडस्पीकर किंवा डीजे लावून नागरिकांना होणाऱ्या त्रासाविरोधातही आम्ही भूमिका घेतली आहे. जे चूक आहे, ते चूकच म्हणण्याची आमची पद्धत आहे. तसे स्पष्ट बोलण्याचे धाडस मोहनराव आपण कधी दाखवणार?” असा खोचक प्रश्न त्यांनी विचारला.

हे देखील वाचा – NEET-PG पात्रता निकषांत मोठी घट; केवळ ४ गुणांवर सरकारी महाविद्यालयात ‘एमएस’ची जागा; वैद्यकीय क्षेत्रात चिंतेचे सावट

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या