Home / महाराष्ट्र / BJP WIN : राज ठाकरेंना मराठी लोकांची साथ नाही! उबाठाला मात्र मुंबईत पसंती !शरद पवार गट संपला! काँग्रेसने लाज राखली! अजित पवार धरणात बुडाले

BJP WIN : राज ठाकरेंना मराठी लोकांची साथ नाही! उबाठाला मात्र मुंबईत पसंती !शरद पवार गट संपला! काँग्रेसने लाज राखली! अजित पवार धरणात बुडाले

BJP WIN – महाराष्ट्रात आणि विशेषतः भाजपाची ताकद कमी होईल अशी चर्चा असताना भाजपाने (bjp)एकहाती पालिका निवडणुका जिंकल्या. त्यातल्या त्यात...

By: Team Navakal
bjp
Social + WhatsApp CTA

BJP WIN – महाराष्ट्रात आणि विशेषतः भाजपाची ताकद कमी होईल अशी चर्चा असताना भाजपाने (bjp)एकहाती पालिका निवडणुका जिंकल्या. त्यातल्या त्यात काँग्रेसने स्वतंत्र निवडणूक ( Election) लढवून लातूर, कोल्हापूर येथे ताकद राखत आपले अस्तित्व जपले. राज्य पातळीवर आता भाजपासमोर (bjp)काँग्रेसच उभी असल्याचे चित्र आहे. ठाकरे ब्रँडकडून मुंबईत फार अपेक्षा असल्याची चर्चा होती, पण सभेला गर्दी करणार्‍या मराठी माणसाने ठाकरे बंधूंना पूर्ण साथ दिली नाही. ‘ही अस्तित्वाची शेवटची लढाई’ असा इशारा दिल्यावरही मुंबईकरांनी भाजपा आणि शिंदे सेनेला जवळ केले. इंजिन चाललेच नाही. उबाठाला मात्र कट्टर शिवसैनिकांची साथ लाभली आणि सत्ता मिळाली नाही तरी मुंबईत उबाठा हा दुसर्‍या क्रमांकाचा मोठा पक्ष ठरला. यानंतर या दोघांची युती टिकेल का हा प्रश्न निर्माण झाला आहे. शिंदे सेनेची कामगिरी यावेळी चांगली होती. हा पक्ष तिसर्‍या क्रमांकांवर स्थिरावला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची मात्र टीकटीक बंदच झाली आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही बालेकिल्ल्यात त्यांचा पराभव झाला. तुतारीने तर आता राजकारण संन्यास घेऊन अजित पवार गटात सामील व्हावे अशी स्थिती आहे. भाजपाचा भ्रष्टाचार बाहेर काढूनही मतदारांनी साथ न दिल्याने एकीकडे अपयश आणि दुसरीकडे भाजपाचा रोष अशा अडकित्त्यात अजित पवार सापडणार आहेत.


भाजपाने सर्वाधिक 29 पैकी 25 महापालिका जिंकून इतिहास रचला.  एकनाथ शिंदे यांनी सातत्याने सभा घेऊन आपल्या शिलेदारांचे गड राखत दुसर्‍या क्रमांकावर पाय रोवले. ठाकरे बंधू राज्यात निष्प्रभ ठरले. मुंबईत भाजपा व शिंदे सेनेलाच मतदारांनी निवडले. मनसेला यावेळीही मतदारांचा पाठिंबा मिळाला नाही. मतदारांनी दोन्ही बंधूंपैकी उद्धव ठाकरे यांनाच पसंत केले. लातूर, परभणी भिवंडी, अमरावती, चंद्रपूर, कोल्हापूर येथे काँग्रेस व मित्रपक्षांनी यश मिळवले. वसई-विरार पट्ट्यात हितेंद्र ठाकूर यांच्या बविआचीच शिट्टी वाजली.
भारतीय जनता पार्टीने सर्वाधिक महापालिका जिंकल्या असून, नवी मुंबई, धुळे, जळगाव, मीरा-भाईदर, सांगली, इचलकरंजी, अकोला, जालना, नांदेड, पनवेल, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, संभाजीनगर, सोलापूर येथे  भाजपाने स्वबळाने सत्ता काबीज केली. नागपूर, कल्याण व ठाणे येथे शिंदेसोबत युतीने बाजी मारली. अहिल्यानगरमध्ये भाजपाची अजित पवार गटाशी युती होती व तिथे त्यांना सत्तेचा कौल मिळाला. कोल्हापुरात महायुतीला काठावरचे बहुमत मिळाले असून, काँग्रेसच्या सतेज पाटील यांनी चांगली टक्कर दिली. 81 जागांपैकी काँग्रेस व उबाठाने येथे 34 जागा जिंकत चांगली कामगिरी केली.


मुख्यमंत्र्यांचा बालेकिल्ला असलेल्या नागपूरमध्ये भाजपाची शिवसेनेशी युती होती. तिथे स्पष्ट बहुमत मिळवताना भाजपाने 102 जागांवर विजय मिळवला तर शिंदे सेनेला फक्त 1 जागा मिळाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी येथे जोरदार प्रचार केला होता. कल्याण-डोंबिवलीमध्ये महायुतीने सत्ता पटकावली असून, या महापालिका निवडणुकीत भाजपा 51 व शिंदे सेनेला 54 जागांवर यश मिळाले असून, मनसेला 5 जागांवर विजय मिळाला आहे. उबाठाचे 9 नगरसेवक विजयी झाले आहे. ठाणे येथे एकनाथ शिंदे यांनी आपला गड अबाधित राखला असून, तिथे महायुतीला सत्ता मिळाली. उबाठाचा ठाण्यात धुव्वा उडाला. 131 जागांपैकी शिंदे सेनेला 66, भाजपाला 28 तर उबाठाला केवळ 1 जागा जिंकता आल्या.


नाशिकमध्ये भाजपा विरोधी तपोवनातील वृक्षतोडीचा कळीचा मुद्दा पक्षांतर्गत गटबाजी असतानाही भाजपाने एकहाती सत्ता पटकावली. 122 जागांपैकी भाजपाला 72 तर शिंदे 26 व अजित पवार 4,  उबाठा 15 व काँग्रेसला 3 ठिकाणी यश मिळाले. मनसेच्या वाट्याला 1 जागा आली.नाशिकमध्ये शिंदे गट आणि राष्ट्रवादी यांची युती होती.नवी मुंबईत भाजपाचे गणेश नाईक यांनी आपला गड राखताना एकनाथ शिंदे यांना मात दिली. भाजपाच्या पदरात 66 जागा पडल्या. शिंदे सेनेला 42 जागांवर समाधान मानावे लागले. धुळे येथे भाजपाने 51 पेक्षा जास्त जागा मिळवल्या व सत्तेचे दार उघडले. जळगावमध्ये भाजपाने 46, शिंदे गट 22 आणि उबाठाला 5 जागा मिळाल्या. उल्हासनगरमध्ये काटे की टक्कर असून, भाजपा व शिंदे सेनेला प्रत्येकी 37 जागांवर यश मिळाले.


सांगलीमध्ये 78 जागांपैकी भाजप  39 जागा जिंकत सत्ता काबीज केली आहे. अजित पवार गट 16 जागा, तर काँग्रेसला 18 जागांवर समाधान मानावे लागले. माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे पणतू आणि काँग्रेसचे उमेदवार हर्षवर्धन पाटील विजयी झाले. इचलकरंजीत महापालिकेची ही पहिलीच निवडणूक होती. यामध्ये राहुल आवाडे यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने बाजी मारली. इचलकरंजी महापालिकेच्या एकूण 65 जागांपैकी भाजपाने 43 जागांवर विजय मिळवून बहुमताचा आकडा (33) पार केला. शिव शाहू विकास आघाडीला 17 जागा मिळाल्या आहेत. शिंदे गटाला 3 तर शिवसेना उबाठाला 1 जागांवर समाधान मानावे लागले.
जालन्यात 65 जागा असून, तिथे  भाजपाने 41 जागा मिळवल्या तर शिंदे गटाला 12 जागा मिळाल्या. काँग्रेसला 9 जागांवर समाधान मानावे लागले. रावसाहेब दानवे यांचे बंधू भास्कर दानवे आणि त्यांच्या पत्नी सुशीला दानवे यांनी आपापल्या प्रभागातून विजय मिळवला तर आमदार अर्जुन खोतकर यांच्या कन्या दर्शना खोतकर प्रभाग क्रमांक 16 मधून विजयी झाल्या.


एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या नांदेडमध्ये यावेळेस काँग्रेसला मोठा फटका बसला. त्यांना केवळ 10 जागांवर समाधान मानावे लागले. भाजपाने खा. अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली नांदेडमध्ये मोठी मुसंडी मारली. 81 पैकी 45  जागांवर विजय मिळवला. शिंदे गटाला 4 व अजित पवार गटाला 2 जागा मिळाल्या. उबाठा गटाला येथे खातेही उघडता आले नाही.
पनवेलमध्ये भाजपाने 56 जागांवर दणदणीत विजय मिळवून पूर्ण बहुमत प्राप्त केले. तर शेतकरी कामगार पक्ष 15 जागांसह दुसर्‍या क्रमांकाचा पक्ष ठरला, शिंदे गटाला 2 जागा आणि उबाठाला 5 जागा मिळाल्या. काँग्रेसला 4 तर अजित पवार गट आणि अपक्ष 1 जागा मिळाली.


सोलापूरमध्ये भाजपाने 87 जागा जिंकत सत्ता काबीज केली तर शिंदे गटाला 4 जागा मिळाल्या आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपा 58 जिंकून सर्वात मोठा पक्ष बनला आहे. पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या मुलाने आणि मुलीने आपापल्या प्रभागातून विजय मिळवला आहे.पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपाविरुद्ध प्रचाराचे रान उठवूनही अजित पवारांच्या हाती काहीच लागलेले नाही. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन स्थानिक भाजपा नेत्यांवर अजित पवार यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. मात्र मतदारांनी त्याकडे पाठ फिरवून पुन्हा भाजपाला साथ दिली. अशा प्रकारे भाजपाने आपला सत्तेचा गड राखला असून 83 जगांसह स्पष्ट बहुमत मिळवले. अजित  पवार गटाला 37 जागा आणि शरद पवार गटाला 1 जागा मिळाली. काँग्रेस व उबाठाला भोपळाही फोडता आला नाही.


पुणे महानगरपालिकेत एकूण 165 जागांपैकी भाजपाने 90 जागा जिंकल्या. दोन्ही राष्ट्रवादीने  ही निवडणूक एकत्र लढवली असली, तरी पुण्यात त्यांना अपेक्षित यश मिळाले नाही. अजित पवार यांना 20  जागा मिळाल्या आहे तर शरद पवार यांची राष्ट्रवादी 10 जागांवर विजयी झाली. त्याशिवाय अकोल्यात भाजपाने 38 जागा जिंकल्या आहेत. परभणी, भिवंडी, अमरावती, चंद्रपूरमध्ये काँग्रेसने यश मिळवले. परभणीत  महाविकास आघाडीने 37 जागांसह बहुमताचा आकडा गाठला. तर भिवंडीमध्ये काँग्रेसने 30 जागा जिंकल्या आहेत. तिथे भाजपासोबत त्यांची काटे की टक्कर आहे. अमरावतीत भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरत असून तिथे काँग्रेससोबत त्यांचा मुकाबला आहे. दोघांमध्ये चुरस असून, रवी राणा यांच्या युवा स्वाभिमानी पार्टीमुळे येथे नवनीत राणा यांनी भाजपाचा प्रचार केला नाही असा कार्यकर्ते आरोप करत आहेत. चंद्रपूरमध्ये काँग्रेसने मुसंडी मारली असून, 30 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला. भाजपा 23
जागांवर आहे.

युतीतही मनसेचा पाय खोलात
पक्षाला अपेक्षित जागा नाहीत

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधू एकत्र आले खरे, पण यात  मनसेचा पाय आणखीच खोलात गेल्याचे दिसत आहे. महापालिका निवडणुकीत पक्षाला अपेक्षित जागा मिळाल्या तर नाहीतच, पण तिकीट मिळाले नाही म्हणून पक्षातील काही नाराज निष्ठावंत मंडळीही साथ सोडून गेली. मुंबईत 227 जागांपैकी महायुतीला 116 (भाजपा 88, शिंदे सेना 28), महाआघाडी 77 (उबाठा 65, मनसे 8), काँग्रेस 23, अजित पवार 3, शरद पवार 1, इतर 11 असा निकाल लागला.मतदारांनी उद्धव ठाकरे यांच्यावरच अधिक विश्वास दाखवला तर राज ठाकरे यांच्या मनसेला केवळ 9 जागांवर रोखले. या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी, ‘फुटाल तर संपाल’ असे भावनिक आवाहन केले होते. शिवसेनेतील फुटीनंतर आपले अस्तित्व सिद्ध करण्याचे उद्धव ठाकरेंकडे मोठे आव्हान होते. ठाकरे गटाने 63 जागांवर विजय मिळवत मुंबई महापालिकेत समाधानकारक कामगिरी केली. दुसरीकडे, राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला या निवडणुकीत मोठा धक्का बसला. युतीमध्ये मनसेने केवळ 53 जागा लढवण्याचा निर्णय घेतला होता. ज्याचा थेट परिणाम त्यांच्या संख्याबळावर झाला. मनसेला केवळ 9 जागांवर विजय मिळाला आहे. राज ठाकरेंनी मुंबईचा महापौर मराठीच असेल अशी गर्जना केली होती, पण मराठी मतदारांनी त्यांना किंगमेकरच्या भूमिकेत ठेवण्यापेक्षा उद्धव ठाकरेंनाच जास्त पसंती दिली. मनसेची ताकद वाढण्याऐवजी ती ठराविक वॉर्डांपुरतीच मर्यादित राहिल्याचे दिसते.

मुंबईत भाजपाचा जल्लोष! फडणवीसांचे जोरदार स्वागत
महाराष्ट्रात भाजपा आणि शिंदेसेनेच्या महायुतीचा 25 पालिकांवर विजय झाल्याचे स्पष्ट झाल्यावर आज भाजपाचे कार्यकर्ते आणि नेते विजयाचा जल्लोष साजरा करण्यासाठी भाजपा मुख्यालयात जमा झाले. विजयाचा गुलाल उधळून त्यांनी ढोल ताशावर जल्लोष केला. यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांपैकी 25 पालिकांवर  भाजपा अथवा महायुतीची सत्ता आली आहे. मुंबईतही निकालाचे कल पाहता पूर्ण बहुमत महायुतीलाच मिळणार असून, मुंबई पालिकेवर महायुतीचा झेंडा फडकेल यात शंकाच नाही. मुंबई महानगरपालिकेवर महापौर बसल्यावर जल्लोष साजरा करू.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे बोलताना म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही गेलो. जनतेने भरपूर प्रतिसाद दिला. जनतेला विकास आणि प्रामाणिकपणा हवा आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद महायुतीला मिळाले आहेत. आमचा मुद्दा हा विकासाचा असणार आणि विचार हिंदुत्वाचा असणार आहे. हिंदुत्ववाद आणि विकासाला कोणी वेगळे करू शकत नाही. जनतेचे समर्थन जेव्हा मिळते तेव्हा जबाबदारीने वागले पाहिजे. विश्वासाला तडा जाऊ नये. सर्व मित्रपक्षाचे आभार,  हा विजय मी कार्यकर्त्यांना समर्पित करतो.यावेळी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मुंबई अध्यक्ष अमित साटम, किरीट सोमय्या, आशिष शेलार, प्रसाद लाड, पंकजा मुंडे, राधाकृष्ण कृष्ण विखे- पाटील उपस्थित होते. कार्यकर्त्यांनी फडणवीस, अमित साटम आणि रवींद्र चव्हाण यांना विजयाचा हार घातला.

महाराष्ट्र कौल
भाजपा – 1425
शिंदे सेना – 402
अजित पवार – 159
उबाठा – 165
काँग्रेस – 318
मनसे – 17
शरद पवार – 34
इतर – 334

मुंबई कौल
भाजपा – 88
शिंदे सेना – 28
अजित पवार – 03
उबाठा – 65
काँग्रेस – 23
मनसे – 08
शरद पवार – 01
इतर – 11

———————————————————————————————————

हे देखील वाचा –

पुण्यात रवींद्र धंगेकरांना मोठा धक्का; पत्नी आणि मुलाचा निवडणुकीत पराभव

महाराष्ट्राचे आभार! महापालिका निवडणुकीतील विजयानंतर पंतप्रधान मोदींचे ट्विट; म्हणाले…

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या