Home / महाराष्ट्र / Raj Thackeray : “भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा!”; युतीच्या घोषणेनंतर राज ठाकरेंची पहिली पोस्ट

Raj Thackeray : “भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा!”; युतीच्या घोषणेनंतर राज ठाकरेंची पहिली पोस्ट

Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ऐतिहासिक युतीची घोषणा झाल्यानंतर राजकीय...

By: Team Navakal
Raj Thackeray
Social + WhatsApp CTA

Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ऐतिहासिक युतीची घोषणा झाल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या घोषणेनंतर राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर केलेली पहिली पोस्ट सध्या प्रचंड चर्चेत आहे.

“कोणत्याही वादापेक्षा आणि भांडणापेक्षा आपला महाराष्ट्र आणि मराठी माणूस मोठा आहे,” अशा शब्दांत त्यांनी या युतीमागची आपली भूमिका मांडली आहे.

एका मुलाखतीतून झाली युतीची सुरुवात

या युतीची ठिणगी राज ठाकरे यांनी एका मुलाखतीत दिलेल्या विधानातून पडली होती. राज यांनी आपल्या पोस्टमध्ये स्पष्ट केले की, “कुठल्याही वादापेक्षा आणि भांडणांपेक्षा आपला महाराष्ट्र आणि मराठी माणूस मोठा आहे” हे केवळ मुलाखतीतले वाक्य नव्हते, तर ती एक तीव्र भावना होती. या भावनेतूनच आज दोन ठाकरे आणि दोन पक्ष एकत्र आले आहेत. ही युती बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित होती, असेही त्यांनी नमूद केले.

मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी एकत्र

राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये स्पष्ट केले की, ही युती केवळ जागावाटपासाठी किंवा सत्तेसाठी नाही. मुंबई आणि परिसरातून मराठी माणसाचे अस्तित्व मिटवण्याचा जो प्रयत्न काही शक्तींकडून सुरू आहे, त्यांना गाडून टाकण्यासाठी ही वज्रमूठ बांधली आहे. त्यामुळे कोणाला किती जागा मिळणार हा तांत्रिक भाग असून त्याचा तपशील संबंधित व्यक्ती योग्य वेळी घोषित करतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

मुंबईचा महापौर ‘मराठीच’ असणार

आगामी महापालिका निवडणुकीनंतर मुंबईचा महापौर हा निर्विवादपणे शिवसेना आणि मनसेचा म्हणजेच ‘मराठीच’ असेल, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. मराठी भाषेच्या आणि मराठी माणसाच्या विरोधात जे षडयंत्र सुरू आहे, त्याला चोख प्रत्युत्तर देण्याची तयारी या युतीच्या माध्यमातून करण्यात आली आहे.

पत्रकारांना आणि माध्यमांना विशेष साद

राज ठाकरेंनी आपल्या पोस्टमध्ये पत्रकार आणि संपादकांना एक भावनिक आवाहन केले आहे. ते म्हणाले की, “तुमच्या मालकांना काय वाटते यापेक्षा तुमच्या सद्सद्विवेक बुद्धीला काय वाटते ते मांडा.” ही दोन पक्षांची लढाई नसून मराठी माणसाची लढाई आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीवेळी ज्याप्रमाणे प्रसारमाध्यमे मराठी माणसाच्या पाठीशी उभी राहिली, तशीच साथ यावेळेस मिळावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

Web Title:
संबंधित बातम्या