Raj Thackeray MNS Gudhi Padwa Melava 2026 : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर ‘महाराष्ट्र-नेक्स्ट’ (Maharashtra-Next) या अत्यंत महत्त्वाकांक्षी अभियानाची घोषणा केली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून एक विशेष व्हिडिओ प्रदर्शित करत, त्यांनी महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि नव्या पिढीच्या प्रगतीसाठी साद घातली आहे. “आपल्या महाराष्ट्राच्या हिताचा, आपल्यालाच विचार करायचा” हा मंत्र देत राज ठाकरे यांनी आगामी राजकीय रणधुमाळीसाठी मनसेची नवी रणनीती स्पष्ट केली आहे.
‘महाराष्ट्र-नेक्स्ट’ व्हिडिओ: गौरवशाली इतिहास आणि आधुनिक स्वप्न-
राज ठाकरे यांनी शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राच्या अस्मितेचे आणि शौर्याचे दर्शन घडवण्यात आले आहे. रायगडासारख्या ऐतिहासिक किल्ल्यांच्या विहंगम दृश्यांपासून सुरू होणाऱ्या या व्हिडिओत “दिल्लीचेही तख्त झुकावे, शौर्य असे दाखवूया” या ओळींतून महाराष्ट्राचा स्वाभिमान अधोरेखित करण्यात आला आहे. यामध्ये केवळ इतिहासच नव्हे, तर कष्टकरी शेतकरी, चाकरमानी आणि उद्योजक यांच्या योगदानाबद्दलही कृतज्ञता व्यक्त करण्यात आली आहे. नव्या युगाचा आणि नव्या पिढीचा प्रगत महाराष्ट्र घडवण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन या अभियानातून करण्यात आले असून, व्हिडिओच्या शेवटी ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना’ आणि ‘महाराष्ट्र-नेक्स्ट’चे बोधचिन्ह (Logo) झळकते.
शिवाजी पार्कवर मनसेचा भव्य गुढीपाडवा मेळावा-
मुंबईतील ऐतिहासिक शिवतीर्थावर (शिवाजी पार्क) आज सायंकाळी ६ वाजता मनसेचा पारंपरिक गुढीपाडवा मेळावा पार पडणार आहे. या मेळाव्यासाठी राज्यभरातून मनसैनिक मोठ्या उत्साहात मुंबईत दाखल झाले आहेत. मैदानावर दोन भव्य स्क्रीन लावण्यात आल्या असून, त्यावर कोणता विशेष व्हिडिओ दाखवला जाणार, याबाबत कार्यकर्त्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे. विशेष म्हणजे, ठाकरे बंधूंच्या राजकीय युतीनंतरचा हा पहिलाच गुढीपाडवा मेळावा असल्याने या सभेला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.
राज ठाकरेंच्या भाषणाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष-
या मेळाव्यात राज ठाकरे नेमकी काय भूमिका मांडणार, याकडे राजकीय विश्लेषकांचे डोळे लागले आहेत. विशेषतः उद्धव ठाकरे यांच्याशी झालेल्या राजकीय सहकार्यानंतर राज ठाकरे या युतीवर काय भाष्य करतात आणि कार्यकर्त्यांना कोणता नवा ‘कानमंत्र’ देतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाची वाटचाल आणि रणनीती ठरवण्यासाठी या मेळाव्याचा उपयोग केला जाणार आहे.
जय्यत तयारी आणि राजकीय रणनीती-
मेळाव्याची जय्यत तयारी अंतिम टप्प्यात असून, पदाधिकारी स्तरावर यापूर्वीच रणनीतीबाबत सविस्तर चर्चा झाली आहे. ‘महाराष्ट्र-नेक्स्ट’ या अभियानाच्या माध्यमातून राज ठाकरे यांनी तरुणांना साद घातली असून, रोजगाराच्या संधी आणि प्रगत पायाभूत सुविधा असलेला महाराष्ट्र निर्माण करण्याचे स्वप्न त्यांनी मांडले आहे. या सभेतील राज ठाकरेंचे भाषण केवळ मनसेसाठीच नव्हे, तर महाराष्ट्राच्या एकूण राजकीय समीकरणांसाठी निर्णायक ठरू शकते.










