Raj Thackeray : मुंबई महानगरपालिका निवडणुकीत महायुतीने सत्ता मिळवल्यानंतर मराठी अस्मितेवरून वातावरण तापले असून, एका मुजोर परप्रांतीय व्यक्तीने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. “आता भाजपची सत्ता आहे, त्यामुळे राज ठाकरेंनाही भोजपुरी शिकावी लागेल,” असे वादग्रस्त विधान या व्यक्तीने सोशल मीडियावर व्हिडिओद्वारे केले होते.
या व्हिडिओमध्ये संबंधित परप्रांतीयाने मुंबईत आता भोजपुरीचे राज्य चालणार असल्याचा दावा करत, “यूपी-बिहारवाल्यांमुळेच राज ठाकरे गायब झाले. पाच वर्षांत वाटले तर मराठी शिकू, नाहीतर भाजप आहे तोपर्यंत भोजपुरीच चालेल,” अशी मुजोरी दाखवली. इतकेच नव्हे तर, “आम्ही यूपी-बिहारवाले आहोत, ज्याला पाहिजे त्याला पंतप्रधान बनवतो, नाहीतर नकाशावरून गायब करतो,” अशा धमकीवजा विधानांनी त्याने संताप वाढवला.
हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच मनसे कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली. गोरेगाव येथील मनसे पदाधिकाऱ्यांनी तातडीने या व्यक्तीचा शोध सुरू केला. परप्रांतीय व्यक्ती शहरातून पळून जाण्याच्या तयारीत असतानाच मनसे कार्यकर्त्यांनी त्याला गोरेगाव परिसरातून ताब्यात घेतले आणि जशास तसे उत्तर दिले.
यानंतर संबंधित व्यक्तीने राज ठाकरे यांची जाहीर माफी मागत, “मला चिथावणी देण्यात आली होती. मी मनापासून हे केले नाही. पुन्हा अशी चूक होणार नाही,” असे सांगत आपली चूक मान्य केली.याबाबत मनसे पदाधिकारी भूषण फडतरे यांनी तीव्र प्रतिक्रिया देताना सांगितले की, “पालिका निवडणुकीचे निकाल लागले, ते आम्हाला मान्य आहेत. मात्र त्यानंतर राज ठाकरे यांच्याविरोधात खालच्या पातळीवर जाऊन अपमानास्पद वक्तव्य करणारा व्हिडिओ आम्ही सहन करणार नाही. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हा व्यक्ती घाबरून पळ काढत होता.
मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्याला पकडले आणि योग्य तो प्रसाद दिला. राज ठाकरे आणि मराठी अस्मितेवर कोणतीही टीका आम्ही खपवून घेणार नाही.” या घटनेमुळे मुंबईतील भाषिक व राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले असून, परप्रांतीय मुजोरी आणि मराठी अस्मितेचा मुद्दा ऐन निवडणूक निकालानंतर पुन्हा केंद्रस्थानी आला आहे.









