Home / महाराष्ट्र / Mumbai News: “मुंबई समजण्यासाठी इथे जन्माला यावं लागतं!”; राज ठाकरेंच्या टीकेला देवेंद्र फडणवीसांचे चोख प्रत्युत्तर

Mumbai News: “मुंबई समजण्यासाठी इथे जन्माला यावं लागतं!”; राज ठाकरेंच्या टीकेला देवेंद्र फडणवीसांचे चोख प्रत्युत्तर

Mumbai News: मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले असतानाच, राज्याच्या राजकारणात ‘मूळ मुंबईकर’ विरुद्ध ‘बाहेरचे लोक’ असा वाद पुन्हा एकदा...

By: Team Navakal
Mumbai News
Social + WhatsApp CTA

Mumbai News: मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले असतानाच, राज्याच्या राजकारणात ‘मूळ मुंबईकर’ विरुद्ध ‘बाहेरचे लोक’ असा वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधत, मुंबईबाहेरच्या राज्यकर्त्यांना मुंबईचे प्रश्न कधीच समजू शकणार नाहीत, असा दावा केला.

याला मुख्यमंत्र्यांनीही आपल्या खास शैलीत उत्तर दिले असून, हा प्रादेशिक वाद आता निवडणुकीच्या केंद्रस्थानी येण्याची शक्यता आहे.

राज ठाकरेंचा ‘डेथ वॉरंट’चा इशारा

संजय राऊत आणि महेश मांजरेकर यांनी घेतलेल्या एका विशेष मुलाखतीत राज ठाकरे यांनी मुंबईच्या प्रश्नांवर भाष्य केले. ते म्हणाले की, “देवेंद्र फडणवीस नागपूरचे आहेत आणि बहुतांश राज्यकर्ते मुंबईच्या बाहेरचे आहेत. एखाद्या शहराचे प्रश्न समजण्यासाठी तिथे जन्माला यावं लागतं. महाराष्ट्राचं ‘डेथ वॉरंट’ काढलं जात असून मराठी माणसाच्या सहीनेच हे घडतंय.” राज यांनी वाढत्या स्थलांतराचा मुद्दा उपस्थित करत सांगितले की, दररोज ५६ रेल्वे गाड्या उत्तर भारतातून महाराष्ट्रात येतात, ज्यामुळे मुंबई आणि ठाणे जिल्ह्यावर प्रचंड ताण येत आहे.

“मी सर्टिफाईड नागपूरकर”; मुख्यमंत्र्यांचे प्रतिआव्हान

राज ठाकरेंच्या टीकेला उत्तर देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘तर्री पोहा विथ देवाभाऊ’ या कार्यक्रमाचा मंच निवडला. राज यांच्या विधानाचा संदर्भ देत ते मिश्किलपणे म्हणाले, “राज ठाकरेंनी मला आता ‘सर्टिफाईड नागपूरकर’ ठरवलं आहे.” मुंबईच्या विकासावर बोलताना त्यांनी थेट सवाल केला की, “जे मुंबईत जन्माला येऊन आता म्हातारे होऊ लागले, त्यांनी एवढ्या वर्षात काय विकास केला? मुंबईचा खरा विकास नितीन गडकरींनी केला, ज्यांनी ५५ उड्डाणपूल बांधले. त्यानंतर मी आणि एकनाथ शिंदेंनी मुंबईचा ३६० डिग्री कायापालट केला आहे.”

विकासाचे व्हिजन आणि यंत्रणेतील दोष

देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की, जरी ते नागपूरचे असले तरी त्यांचे लक्ष संपूर्ण महाराष्ट्राच्या विकासावर आहे. समृद्धी महामार्ग केवळ नागपूरसाठी नाही, तर संपूर्ण राज्याला जोडण्यासाठी आहे. “धुळे ते गडचिरोली असा व्यापक विचार आम्ही करतो,” असे त्यांनी नमूद केले. तसेच, लोकांच्या समस्या नेमक्या कोणाकडे सोडवायच्या (महानगरपालिका की केंद्र), याबाबत असलेल्या गोंधळावर भाष्य करताना त्यांनी यंत्रणेतील दोष दूर करण्याची गरज व्यक्त केली.

निवडणुकीच्या तोंडावर रंगलेला हा ‘मुंबईकर विरुद्ध नागपूरकर’ वाद मतदारांना कोणाच्या बाजूने खेचतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

हे देखील वाचा – Mumbai Local Fire: मध्य रेल्वेवर ‘बर्निंग ट्रेन’चा थरार! कुर्ल्याजवळ कचरावाहू लोकलला भीषण आग

Web Title:
संबंधित बातम्या