Raj Thackeray on Namo Paryatan Kendra: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मुंबईतील वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात घेतलेल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मत चोरीच्या मुद्द्यावर सादरीकरण केले आणि 1 नोव्हेंबरच्या बहुचर्चित मोर्चाची तयारी करण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना दिल्या.
याच वेळी त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर ‘चाटूगिरी’ करत असल्याचा थेट आरोप करत जोरदार टीका केली.
किल्ल्यांवर ‘नमो पर्यटन केंद्र’ उभारणीवर आक्षेप:
राज ठाकरे यांनी वर्तमानपत्रात छापून आलेल्या एका बातमीचा संदर्भ देत सरकारवर हल्लाबोल केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, एकनाथ शिंदे यांच्या पर्यटन खात्यामार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त राज्यातील काही गड-किल्ल्यांवर ‘नमो पर्यटन माहिती व सुविधा केंद्र’ उभारण्याचा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे.
- योजनेत समाविष्ट किल्ले: या निर्णयानुसार, पहिल्या टप्प्यात शिवनेरी, रायगड, राजगड, प्रतापगड आणि साल्हेर या ऐतिहासिक किल्ल्यांच्या परिसरात ‘नमो पर्यटन केंद्र’ स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या 4 किल्ल्यांसाठी सरकारने 20 कोटी रुपयांचा निधीही मंजूर केला आहे. या केंद्रांद्वारे 75 पर्यटन स्थळांवर पर्यटकांसाठी आधुनिक सुविधा पुरवल्या जाणार आहेत.
राज ठाकरेंचा इशारा: या केंद्रांना ‘नोड नमो पर्यटन केंद्र’ असे नाव देण्यावर राज ठाकरे यांनी तीव्र आक्षेप घेतला. ते म्हणाले, “ज्या ठिकाणी फक्त आमच्या महाराजांचे नाव असले पाहिजे, तिथे हे आता पर्यटन केंद्र उभारणार आहेत. मी आताच सांगतो. आमच्याकडे सत्ता असो वा नसो, हे पर्यटन केंद्र उभे केले की, फोडून काढणार.”
“मुख्यमंत्री पदासाठी किती लाचारी करणार?”
राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सत्तेसाठी लाचारी करत असल्याची थेट टीका केली. ते म्हणाले, “मला मुख्यमंत्री पद हवे म्हणून किती लाचारी करणार? खाली काय चाटूगिरी चालू आहे, हे वर पंतप्रधान मोदींनाही माहीतही नसणार. सत्ता डोक्यात गेल्यामुळे वाटेल ते करू, हा विचार येतो.”
सत्तेसाठी हे लोक काहीही करत आहेत. गड-किल्ल्यांवर नमो केंद्र सुरू करणार आणि मुंबईतील जागा देखील याचसाठी अदानीला दिल्या जात आहेत, असा आरोप त्यांनी केला.
ईव्हीएम आणि 1 नोव्हेंबरचा मोर्चा:
राज ठाकरे यांनी या सर्व गोष्टी सत्तेतून येतात आणि सत्ता ईव्हीएम मशीनमधून येते, असा टोला लगावला. विधानसभेच्या निवडणूक निकालाबाबत प्रत्येक राजकीय पक्ष आणि मतदाराच्या मनात शंका आहे. “मतदारांनी 5 वर्षे बघितलेल्या स्वप्नांची राखरांगोळी जर ईव्हीएम मशीन करणार असेल, तर निवडणुकीचा उपयोग काय?” असा सवाल त्यांनी केला.
या विरोधात महाराष्ट्राने पुढाकार घ्यायला हवा, असे आवाहन करत 1 नोव्हेंबर रोजी निवडणूक आयोगाविरोधात होणाऱ्या ‘सत्याच्या मोर्चात’ मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.
हे देखील वाचा – Justice Surya Kant: न्यायमूर्ती सूर्यकांत होणार भारताचे 53 वे सरन्यायाधीश; जाणून घ्या त्यांच्याविषयी
 
								 
								 
								 
								 
								 
				 
															 
								








